Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

SANSKRITISANSKRITI DHARA

ashoka tree – निसर्ग शोकनाशक अशोक

1 Mins read

ashoka tree – निसर्ग शोकनाशक अशोक

ashoka tree – निसर्ग शोकनाशक अशोक – Dr. Swati Dravid         

 

Dr. Swati Dravid 

 

 

 निसर्ग आणि मानव यांच्यातलं नातं कमालीचं गहिरं,परस्परावलंबी असतं. निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडणारा,बागडणारा माणूस निसर्गाच्या भव्योदात्त रूपामुळे नतमस्तक होतो,भारावून जातो. ऊन,वारा,पाउस,झाडं-वेली,प्राणी-पक्षी अशा नैसर्गिक देणग्यांचा लाभ घेतानाच त्याच्या बेफाम,अथांग रूपांना दबकून असतो. माणूस सृष्टीचे वेगवेगळ्या रूपांत पूजन करतो; तिच्याबद्दल आदर दाखवतो. हरएक बदलत्या ऋतूची,त्या त्या मोसमात आपल्याला प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक भेटींची कृतज्ञता त्यांच्याच माध्यमातून व्यक्त करतो.फुले-पाने,झाडे,नद्या,पर्वत या निसर्गाच्या उद्गारांबद्दल वाटणारा आपला स्नेह दर्शवितो. त्याची ही सृजनाविषयी आपुलकीची,आदराची भावना यथावकाश एखाद्या विधीमध्ये रूपांतरित होते. हळुहळू या विधींवर रीति-परंपरांचे कोंदण जडत जाते.जगभरात माणसाचं निसर्गाशी असणारं हे अतूट नातं निरनिराळे ऋतुमानानुसार करावयाचे सणवार,कुलाचार, धार्मिक विधी यांच्या माध्यमातून घट्ट गुंफलेलं दसून येतं. भारतीय उपखंडातील सणांचा,व्रतांचा,छोट्या छोट्या विधि-परंपरांचा मागोवा घेतला तर निसर्ग आणि मनुष्य यांच्यातील परस्पर-पूरक भावबंधावर शिक्कामोर्तब होतं.

 

Also Read : https://www.postboxindia.com/meaning-of-margashirsha/

भारतीय प्राचीन साहित्याचा विचार केला तर अगदी थेट वेदवाङ्ग्मयापासून माणसाचे निसर्गपूजकत्व अनेकदा अधोरेखित झाले आहे . ऋग्वेदात प्राचीन ऋषींनी सोम या वनस्पतीचे स्तुतीगान अनेक सूक्तांद्वारे केलेले दिसते. ऋग्वेदाच्या दहा मंडलांपैकी एक म्हणजे नववे मंडल सोम वनस्पतीची देवता म्हणून स्तुती करणारे आहे. त्या वनस्पतीचा रस काढणे, तो विविध यज्ञविधींमध्ये वापरणे याबद्दलच्या वेगवेगळ्या पद्धती त्या काळात रूढ झालेल्या दिसतात. सोमरस प्राशन केल्याने माणसाला अनोखी शक्ती मिळते असा विश्वास देखील त्या काळात असल्याचे दिसते. अथर्ववेदाऔषधी गुणधर्म असणाऱ्या काही वनस्पतीचे उल्लेख आले आहेत. यापुढच्या म्हणजे ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे यांच्या कालखंडात देखील पळस, औदुम्बर, अश्वत्थ म्हणजे पिंपळ, वड अशा अनेक झाडांचे उल्लेख आढळतात. यज्ञप्रसंगी निरनिराळ्या झाडांच्या फांद्यांच्या समिधा म्हणून वापरल्या जात असत, यज्ञभूमीवर वेगवेगळ्या झाडांपासून केलेले यूप उभारले जात असत. पुराणकाळात तर देवता आणि वृक्ष- वनस्पती यांचे तादात्म्य साधले गेले. त्या काळी प्रभावशाली असणाऱ्या अनेक देवीदेवतांना कोणत्या न कोणत्या झाडाशी किंवा फळाशी जोडले गेले, ते विशिष्ट झाड म्हणजेच ती देवता असे समीकरण मांडले गेले किंवा एका विशिष्ट देवतेला एक खास फळ किंवा फूल अथवा त्या विशिष्ट झाडाचे पान अर्पण करून त्या देवतेची पूजा बांधावी असे सांगितले गेले.(जसे:- पिंपळ – विष्णू, बिल्व – लक्ष्मी इ.) ती झाडे मुद्दाम लावल्यास कोणते फळ मिळते, काय लाभ होतात याच्या चर्चा पुराणांनी केल्या आहेत. या सर्व उल्लेखावरून मानवी संस्कृतीच्या प्रवासात झाडे, वेली, वनस्पती यांच्याशी माणसाचे एक अनोखे नाते उमलत गेले व हळूहळू दृढ झाले होते, असे दिसून येते. हेच नाते समाजमनात अधिक रुजावे म्हणून निरनिराळ्या झाडावेलींना सण, व्रते, विधी यांच्या चौकटीत स्थान दिले गेले, असे आपण म्हणू शकतो. भारतीय परिघात आजही वटपौर्णिमा, आमलकी एकादशी, अरण्य षष्ठी, नवान्न पौर्णिमा असे काही विधी रूढ असलेले दिसतात. या व्रतांच्या- विधींच्या नावांतच त्यांचे निसर्गाशी, निरनिराळ्या झाडा वनस्पतींशी असलेले नाते आढळते.

ashoka tree 1

ashoka tree 1

माणसाचं निसर्गाशी असणारं बहुपेडी नातं दाखविणारा एक आगळा विधी म्हणजे चैत्र महिन्यातील शुक्लपक्षातील अष्टमीच्या दिवशी केला जाणारा अशोककलिका प्राशन विधी होय. आजच्या काळात हा विधी आवर्जून साजरा केला जाताना दिसत नाही. पण वार्षिक दिनदर्शिकेत ज्याअर्थी या विधीचा उल्लेख येतो त्याअर्थी तो काही काळापूर्वी आवर्जून साजरा केला जात असावा किंवा महाराष्ट्राबाहेर काही प्रांतात, आजही या विधीच्या थोड्या पाउलखुणा शिल्लक असाव्यात, असे दिसते. चैत्राच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला जर कोणी स्त्री ashoka tree अशोकाच्या आठ कळ्या प्राशन करेल तर तिचे सर्व दुःख दूर होऊन,सर्व मनोवेदना नाहीशा होतील असे सांगितले जाते.

अशाच प्रकारचा विधी वैशाख महिन्याच्या शुद्ध तसेच कृष्ण षष्ठीलाही साजरा केला जातो. या दिवसाला अशोकषष्ठी म्हटले जाते. पौराणिक ग्रंथांत सर्व दुःखांचे निवारण होऊन सुखप्राप्ती व्हावी यासाठी अशोकत्रिरात्रिव्रत सुद्धा सांगितले आहे. शिवाय, वसंतऋतूच्या आगमनप्रसंगी तरुणी अशोकाच्या कळ्या-फुले वेचत असत,असा अशोककलिकाप्रचयन विधी पूर्वी केला जात होता,असे उल्लेख प्राचीन साहित्यात सापडतात.

www.postboxindia.com

#seetaashoka

हे सर्व उल्लेख पाहता, अशोक वृक्षासंबंधी,त्याच्या भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण स्थानाबद्दल माहिती करून घेणे योग्य ठरेल.

अशोकाचा वृक्ष ashoka treeसीताशोक,अंगनाप्रिय,हेमपुष्प,मधुपुष्प,कनकेली अशा अनेक नावांनी ओळखला जातो. अशोक ( Saraca asoca ) सदाहरित प्रकारचा, भारताच्या मध्यभागात,पूर्वेकडे तसेच दक्खनच्या पठारावर,पश्चिमेच्या घाटप्रदेशात दिसून येणारा हा वृक्ष,त्याच्या पौराणिक संदर्भांमुळे विशेष महत्त्वाचा आहे. सदाहरित प्रकारच्या या वृक्षाची उंची मध्यम, तर पाने कोवळी असताना सुरेख तांबूस आभा धारण करणारी असतात. जसजशी ही पाने जून होत जातात तसतसा त्यांचा रंग गर्द हिरवा होतो,या पानांना एक वेगळी तुकतुकी सुद्धा असते. गुच्छांनी येणाऱ्या त्याच्या फुलांचा आकार लांबट असून,चार पाकळ्या असणाऱ्या या फुलांचा रंग आधी पिवळा व नंतर क्रमाक्रमाने केशरी- तांबडा होत जातो. फुलांना एक मंद,वैशिष्ट्यपूर्ण सुगंध असतो. अशोकाच्या झाडासंबंधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना रक्ताशोक, नीलाशोक आणि सुवर्णाशोक असे या झाडाचे तीन प्रकार त्याच्या फुलांच्या रंगानुसार पडल्याचे दिसतात.

Also Read : https://www.postboxindia.com/sanskrit-literature/

सर्वसामान्यपणे अनेक ठिकाणी सर्रास आढळणारे, उंच वाढणारे,लांब पाने असणारे आणखी एक झाड म्हणजेच अशोक होय असा लोकप्रिय गैरसमज आहे.पण,पुराणकथांमध्ये येणारा,शुभ कार्यांत ज्याच्या पानांचा वापर केला जातो तो हा अशोक नव्हे. या दोन झाडांमधला गोंधळ टाळण्यासाठीच या दुसऱ्या उंच वाढणाऱ्या अशोकाला “False Ashoka” असे संबोधले जाते.

www.postboxindia.com

#seetaashoka

सर्वसामान्य माणसाला अशोक वृक्ष माहित आहे तो रामायणातील अशोक वाटिकेच्या उल्लेखामुळे ! रावणाने सीतेला अशोक वाटिकेत नेऊन ठेवले होते,हा संदर्भ सर्वविदित आहे. मत्स्य पुराणाने घराच्या अवतीभवती आवर्जून लावावयाच्या झाडांमध्ये अशोकाचा समावेश केला आहे.वराहमिहिराच्या बृहत्संहितेने घरात शांतता,समाधान राहावे यासाठी काही झाडे सुचविली आहेत,त्यात अशोकाचा अंतर्भाव केला आहे. नदीच्या काठावर शोभेसाठी मुद्दाम अशोकाची झाडे लावली जावीत,असे प्राचीन ग्रंथांत निर्देशिले आहे. या झाडाची पानं कोवळी असताना एक आगळी  तांबूस आभा धारण करतात तेव्हा फारच मनमोहक वाटतात. आजच्या काळात लाल तसेच पिवळा – केशरी बहार असणारा अशोक आढळतो पण निळ्या रंगाचा बहार असणारे झाड आढळत नाही. काळाच्या ओघात या वृक्षाचा हा खास वाण कदाचित अतिशय दुर्मिळ झाला असावा. तांबूस पालवी आणि पिवळी- केशरी फुले यांनी नटलेले हे सुवासिक झाड फक्त सुरचित उद्यानांचीच नव्हे तर  घरांच्या आसमंतांची शोभा वाढविणारे झाड म्हणून मान्यता पावले होते,असे या उल्लेखांवरून  कळून येते. वसंतऋतूत अशोकाला बहर येतो तेव्हाचे वर्णन करताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात –

                When a wind from across the sea,

                     Comes to this shore,

                     Red fire ignites the spring,

                     And sparks the Asoka tree,

                             Into golden fire.

या कवितेतून वसंताचे झळाळते सृष्टीवैभव आणि अशोकाचा सोनसळी डौल यांच्यातील अभिन्न नाते अगदी चित्रदर्शी पद्धतीने व्यक्त झालेले दिसते. जेव्हा मधुमास वसंताचं डोळ्यांचं पारणं फेडणारं वैभव बऱ्याच झाडांच्या अंगाखांद्यावरून निथळू लागतं गुलमोहर,मंदार,पळस,अर्जुन..सगळे वृक्ष एकेक करून आपला पुष्पसंभार सांभाळत सृष्टीच्या रंगमंचावर हजेरी लावतात . त्यातलाच एक सन्मान्य कलाकार म्हणजे अशोक.

ashoka tree 2

ashoka tree 2

                                                                                                                                                                                                            आज आपल्याला हा वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळत नसल्याने त्याचं लक्षवेधी रूप पाहायला ठराविक ठिकाणीच फेरफटका मारावा लागतो. जसे – मुम्बईतील राणीचा बाग,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे गेल्यावर अशोकाचे सौंदर्य दृष्टीस पडू शकते. या ठिकाणी असणाऱ्या अशोकाच्या झाडांचा आनंद घेण्यासाठी वेगेवगळे पक्षी गर्दी करतात ,फुलांभोवती मधुप्रेमी भुंगे,मधमाशा  गुंजारव करीत असतात. जणू काही पक्षी, कीटकांचाही शोक – संताप तो हरण करतो.म्हणूनच प्राचीन साहित्यात या वृक्षाला षट्पदानन्दवर्धन – भुंग्याना प्रिय असणारा,असे नाव प्राप्त झाले असावे. तसेच,या झाडाच्या शेंगा लंगूर प्रजातीच्या वानरांना,खारींना आवडतात,त्यामुळे त्यांचीही झुंबड या झाडांवर उडालेली असते, अशी निरीक्षणे निसर्गप्रेमींनी केली आहेत. प्राणीजगताला देखील आवडणारे, उपयोगी पडणारे हे शोभिवंत वृक्ष आपण शहरात मोठ्या प्रमाणावर लावले पाहिजेत,असे कळकळीचे आवाहन शहराच्या सुशोभीकरणाबद्दल विचार करणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी केलेले दिसते. ( आनंद पेंढारकर, ‘Bring in the real Ashoka’,Mid Day, जुलै,२०१५)

 

Also Read : https://www.postboxindia.com/welcome-to-english-empire-in-india-article-by-dr-swati-dravid/

या झाडाचे वेगळेपण खरे तर त्याच्या नावापासूनच सुरू होते. ashoka tree अशोक म्हणजे अ + शोक, जेथे शोकाला किंवा दुःखाला वाव नसतो,थारा नसतो असा – सदैव आनंद देणारा, सकारात्मक उर्जा पसरविणारा असा हा वृक्ष !

ashoka tree 3

ashoka tree 3

 

 एका पौराणिक कथेनुसार अगदी प्राचीन काळी एका जंगलात कोणी एक नरभक्षी वाटमार्या राहत असे.जंगलाच्या वाटेने जाणाऱ्या-येणाऱ्या वाटसरूंना लुबाडणे,मारणे,त्यांचे मांस भाजून खाणे हेच त्याचे काम! पण समोर आलेल्या एका ऋषीच्या स्थिरचित्त शांत स्वभावाने,निर्भय वृत्तीने या लुटारूला गोंधळवून टाकले. स्वतःच्या वाईट,क्रूर कृत्यांबाद्दलचा खराखुरा पश्चात्ताप त्याच्या मनात जागा झाला आणि त्यातून त्याचे मन अपार शोकाने भरून गेले. आता,या मानसिक ओझ्यातून सुटका कशी करून घ्यावी म्हणून तळमळत तो त्याच ऋषींना संपूर्ण शरण गेला.तेव्हा ऋषीवरांनी त्याला पुढचा जन्म एका झाडाचा मिळेल असे भाकित केले. वृक्षजन्म प्राप्त करून तो आजन्म परोपकार करणार होताच,त्याशिवाय बंदिनी असणाऱ्या सीतेच्या मनातील शोकसंताप नाहीसा करण्याचे महत्कर्म त्याला करावयाचे होते. अशा प्रकारे त्या दरोडेखोराला पुढचा जन्म ashoka tree अशोक वृक्षाचा मिळाला. स्वतःचा आधीचा जन्म निन्दनीय कर्मे करीत,इतरांची आयुष्ये शोकमग्न – ‘सशोक’ करीत व्यतीत केलेल्या त्याने त्याचा वृक्षजन्म मात्र सार्थकी लावला. सीतेला अशोक – वाटिकेत धीराची सोबत केली,तिच्या मनातील आशेची-विश्वासाची ज्योत आपल्या पानांच्या सळसळीने जणू तेवती ठेवली. यानंतर, आपल्या प्रसन्न अस्तित्त्वाने इतरांच्या मनातला शोक नाहीसा करणे हेच त्याचे जीवनध्येय झाले. ही कथा अर्थातच ‘अशोक‘ ashoka tree या आगळ्या नावाची सार्थकता सिद्ध करण्याकरिता प्रसृत झाली आहे. पण रामायणात अनेकदा या वृक्षाचा उल्लेख आढळतो. कैकेयीच्या महालाभोवती असणारा, रामाच्या महालालगत असणारा – सीता ज्याच्या अवतीभवती वावरत असे असा, पंचवटीत राम – सीतेला भेटलेला आणि लंकेत दिसून येणारे नील- अशोक, सुवर्ण- अशोक तसेच नेहेमीचा पिवळा-केशरी फुलांचा अंगरखा घालणारा अशोक. रामायणात एके ठिकाणी रावणाची तुलना, ज्यावर ठायी ठायी लालजर्द फुलांचे अशोकवृक्ष बहरले आहेत, अशा प्रचंड पर्वताशी केली आहे. ( राम.५.२२.२८)

ashoka tree 4

ashoka tree 4

बौद्ध ग्रंथांनुसार, शाक्यराणी महामाया, लुम्बिनी उद्यानात फेरफटका मारत असतानाच तिला प्रसव-वेदना जाणवू लागल्या,तेव्हा दमून,वेदनांनी क्लांत होऊन,ती एका अशोक वृक्षाखाली बसली. त्या वृक्षाची खाली झुकलेली एक फांदी धरून तिने प्रसवाच्या कळा सहन केल्या.अशोकाने या आसन्नप्रसवेचे सारे श्रम नाहीसे केले, राणी सुखपूर्वक प्रसूत झाली.जगताला परम शांतीचा मार्ग दाखविणाऱ्या युगप्रवर्तक सिद्धार्थाचे पहिलेवहिले दर्शन शोकनिवारक वृक्षाने घेतले,हा किती सुंदर योग म्हणावा ! ह्यु-एन-त्संग नावाच्या भारतयात्रेवर आलेल्या चिनी प्रवाशाने ashoka tree अशोक वृक्ष आणि सिद्धार्थ गौतमाशी संबद्ध असणारी ही कथा ऐकली होती असे त्याच्या प्रवासवर्णनावरून लक्षात येते.त्यावरून, अशोक वृक्ष व  गौतम बुद्ध यांच्यातील घनिष्ठ नाते,भारतवर्षात अनेक शतके प्रसिद्ध होते,हेही स्पष्ट होते.काही बौद्ध ग्रंथांच्या मते, भगवान गौतम बुद्धांच्या मृत्युनंतर अशोक वृक्षामध्ये निवास करणाऱ्या वृक्षदेवीला शोक अनावर झाला,तेव्हा तिने आपले पर्णरूपी अश्रू ढाळले.परमकारुणिक भगवान गौतमाच्या निधनामुळे, दुःखार्त होऊन त्यांच्याशी जन्मापासून निगडित असणारा हा वृक्ष जणू आपल्या पानांद्वारे शोकलेख लिहित होता,असेच या वर्णनावरून वाटते. अशा प्रकारे बुद्धाच्या जन्म-मृत्यूशी जोडला गेलेला हा वृक्ष आहे.इतकेच नव्हे,तर, जैनतीर्थंकर भगवान् श्रीवर्धमान महावीरांनी आपली तपश्चर्या वैशाली नगरीच्या बाहेर असणाऱ्या एका अशोक वृक्षाखाली पूर्ण केली असे सांगितले जाते. संसाराच्या तापत्रयातून शाश्वत सुटका होण्यासाठी,चिंतन-मनन करण्याकरिता ज्ञानी विभूतींनी या झाडाची निवड करावी यातच त्याच्या नावाची सार्थकता दडली आहे.

ashoka tree 6

ashoka tree 6

 मत्स्य पुराणाने घराच्या अवतीभवती आवर्जून लावावयाच्या झाडांमध्ये अशोकाचा समावेश केला आहे.वराहमिहिराच्या बृहत्संहितेने घरात शांतता,समाधान राहावे यासाठी काही झाडे सुचविली आहेत,त्यात अशोकाचा अंतर्भाव केला आहे. नदीच्या काठावर शोभेसाठी मुद्दाम अशोकाची झाडे लावली जावीत,असे प्राचीन ग्रंथांत निर्देशिले आहे. या झाडाची पानं कोवळी असताना एक लालसर आभा धारण करतात तेव्हा फारच मनमोहक वाटतात.

याशिवाय अशोक ashoka tree आपल्यासमोर येतो तो कामदेवाचे आयुध म्हणून !

अरविन्दमशोकं चूतं नवमल्लिका, नीलोत्पलं पञ्चैते पञ्चबाणस्य सायकाः ||

कामदेवाच्या भात्यातील पाच बाणांमध्ये अशोकाचा समावेश केला गेला आहे. अशोकाचा ashoka tree हा प्रेमपैलू कालिदासासारख्या सिद्धहस्त रचनाकारालाही खुणावतो.कालिदासाने आपल्या कुमारसंभव या महाकाव्यात कामदेवाच्या आगमनाने बहरलेल्या तपोभूमीचे वर्णन करताना फुलून आलेल्या अशोकाचा उल्लेख केला आहे. मालविकाग्निमित्रम् या त्याच्या पहिल्याच नाट्यलेखन-प्रयत्नात कालिदासाने ashoka tree अशोकाबद्दलच्या कविकल्पनेचा वापर प्रभावीपणे केला आहे.या नाटकात, मालविका या नायिकेच्या मनातील राजा अग्निमित्राबद्दलचे प्रेम उघड करण्यासाठी आणि या प्रेमाला सुफळ-सम्पूर्णत्व मिळणार आहे याची ग्वाही नायक-नायिका आणि प्रेक्षकांना निःसंदिग्धपणे मिळावी यासाठी अशोक-दोहद प्रसंगाचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. संस्कृतसाहित्यातील वृक्ष-दोहद कल्पना मोठी मनोरम आहे.प्रियंगु,नमेरू,केसर,कुरबक,बकुळ अशा काही वृक्षांच्या डोहाळ्यांचे वर्णन संस्कृत साहित्यात वारंवार  येते. गरोदर स्त्रियांप्रमाणेच या वृक्षांचे काही खास हट्ट किंवा डोहाळे असतात,ते एखाद्या सुंदर स्त्रीने पुरविले की ते ते झाड सर्वांगाने बहरून येते,असा खूप छान संकेत या कल्पनेत आढळतो. झाडावेलींना जीव असतो आणि त्यांना भावना,इच्छा देखील असतात हा प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीला मान्य असणारा विचार अशा वेगवेगळ्या प्रकारे लोकरूढींतून व साहित्यातून उमटलेला दिसून येतो. अशोकाला सुंदरीच्या लत्ताप्रहाराचे डोहाळे असतात,त्यानुसार, अळत्याने पावले रंगवलेली,अशोकाच्या कळ्यांचा शृंगार केलेली मालविका अशोकवृक्षाला डाव्या पावलाने स्पर्श करते / त्यावर हलका आघात करते, तेव्हा अशोक सर्वांगाने फुलून येतो. शंकराचार्यांच्या सौन्दर्यलहरी या स्तोत्र काव्यात देवीच्या अळत्याने रंगविलेल्या पावलांकडे पाहताना प्रत्यक्ष भगवान पशुपतींचे भान हरपून गेले आहे व ते त्या पाद्स्पर्शाची अभिलाषा करणाऱ्या अशोकाचा मनोमन राग- राग  करीत आहेत असा उल्लेख मिळतो-

 

असूयत्यन्तं यदभिहननाय स्पृहयते, पशूनामीशानः प्रमदवनकङ्केलीतरवे ||’  इथे खरे तर वृक्ष आणि मानव यांच्यातील सीमारेषा पुसट झाल्या आहेत.वृक्ष-दोहद हे एक नितांत सुंदर रूपक म्हणून सामोरे येते. सुंदरीकडून डोहाळे पुरवून घेणारा प्रत्येक वृक्ष म्हणजे खरे तर एक उत्सुक,अधीर, चतुर, आर्जवी जोडीदार पुरुष आहे – स्खलनशील तसेच क्षमाप्रार्थी ! ज्याला आपल्या प्रियेच्या रुकाराची,तिच्या धीट पुढाकाराची किंवा तिच्याकडून क्षमेची अपेक्षा असते. अशा प्रकारे, अशोकवृक्ष प्रेमातील लटक्या रुसव्या-फुगव्यांचा,क्षणैक वंचनेचा,त्यातून निर्माण झालेल्या कलहाचा,अनुनयाचा-स्वीकृतीचा-सगळ्या टप्प्यांचा साक्षीदार झालेला दिसून येतो. म्हणूनच,इथे  एका स्त्रीने पुरविलेले वृक्षाचे दोहद म्हणजे केवळ त्या वृक्षाचे पक्षी नायकाचे  कोडकौतुक करणे, त्याच्या इच्छा पुरविणे असा अर्थ नाही तर यातून स्त्री- पुरुष तसेच मानव आणि वृक्ष, दोघांनीही साधलेले मनाचे तादात्म्य व त्यातून त्य दोघांचाही पुढे सुरु राहिलेला समंजस एकात्म प्रवास असेही समजणे अगदी योग्य ठरेल. अशोकाशी संबंधित या दोहदाच्या कविकल्पनेमुळे त्यालाकान्ताड्.घ्रिदोहदकान्ताचरणदोहद अशीही नावे  रूढ झाली आहेत. मत्स्य पुराणानुसार अशोकवृक्ष हा देवी पार्वतीचा देखील लाडका वृक्ष होता. एकदा देवीने अशोकाचे रोप लावले तेव्हा इतर देवीदेवतांनी तिला अशोकाचे फायदे काय अशी पृच्छा केली. त्यावर देवी म्हणाली ‘एक तलाव बांधणे हे दहा विहिरी बान्धण्याइतके पुण्याचे काम आहे, एका पुत्राचा जन्म हे दहा तलाव निर्माण करण्याइतके पुण्यप्रद आहे तर एक अशोकाचे झाड लावणे हे दहा पुत्रांच्या जन्माइतके पुण्यशील कार्य आहे.’ यारून आपल्या संस्कृतीने वृक्ष लावणे,जगविणे, वाढविणे हे काम एक मूल जन्माला घालणे तसेच जबाबदारीने वाढविण्याइतकेच महत्त्वाचे मानले आहे, हे कळून येते.

अशाच एका आख्यायिके नुसार एकदा पार्वती देवीने अशोकाच्या वृक्षाकडे एक कन्या मागितली, अशोकाच्या झाडाने तिची इच्छा तत्काळ पूर्ण केली, तेव्हा देवीने त्या कन्येचे नाव अशोकसुंदरी असे ठेवले. भगवान शिव विश्वाच्या कल्याणासाठी जगभर भ्रमंती करत असत पण तेव्हा पार्वतीला एकटेपणा वाटत असे, साक्षात देवीचा एकटेपणा, तिचे दुःख अशोकाने कन्येच्या रूपाने पूर्ण केले.

  भारतीय शिल्पसृष्टीत,बौद्ध विहारांच्या, हिंदू देवालयांच्या द्वारांवर अनेकदा, अशोकवृक्षासोबत एका  यक्षिणीचे शिल्प आढळते.डाव्या हाताने व डाव्या पायाने अशोकाच्या वृक्षाला विळखा घातलेली ही यक्षिणी अशोक-दोहदाची पूर्ती करणारी सुंदरी असल्याचे मानले जाते. यक्षी आणि वृक्षाचे शिल्प म्हणजे वृक्ष व त्याला विळखा घातलेली वेल आहे असाही समज आहे. भारतीय पुराकल्पनांनुसार यक्षी हे प्राचीन काळातील वृक्षपूजक पंथाचे तसेच, वैपुल्याचे – वंशसातत्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून यक्षी,झाडांचे पूजन तसेच संरक्षण सूचित करतेच तसेच ती प्रत्येक वृक्षाच्या संजीवक रसशक्तीचे प्रतीक म्हणून देखील सामोरी येते. झाडात अस्तित्त्वात असणारी द्रवरूप शक्ती म्हणजेच सरतेशेवटी सर्व जगताचा मूलाधार असणारी जलशक्ती होय.यावरून,अशोक हे केवळ एक झाड राहत नाही तर तो निसर्गशक्तीच्या सुफलनाचे,विस्ताराचे,प्रसाराचे प्रतीक ठरतो. त्यामुळे, त्याच्यासोबत असणाऱ्या यक्षसुंदरी या त्या शक्तीच्या,सामर्थ्याच्या कारक त्याचप्रमाणे वाहक ठरतात.

जैन,बौद्ध आणि हिंदू धर्मांत लोकप्रिय व पूजनीय असणारा हा अशोकवृक्ष हळुहळू विधींच्या कोंदणात प्रतिष्ठापित झाला. दोहदप्रसंगातून किंवा निरनिराळ्या व्रतांतून – विधींतून,शिल्पाकृतींतून अशोकाचा संबंध स्त्रीवर्गाशी जास्त असलेला दिसून येतो. विद्वानांच्या मते अशोकाशी निगडीत असणारे हे सारे उल्लेख म्हणजे प्राचीन भारतात प्रचलित असणारे प्रतिकात्मक असे सुप्रजनननाचे विधी होत.

www.postboxindia.com

#seetaashoka

आयुर्वेदशास्त्राच्या विचारानुसार ,चरक संहितेनुसार अशोकाचा – या वृक्षाच्या सालीचा,पुष्पांचा,पानांचा,बियांचा उपयोग करून निरनिराळी औषधे तयार करता येतात. अशोक हा ज्वरनाशक, कषायरसाचा म्हणून मान्य आहे. त्वचारोगांत देखील अशोकाचा उपयोग होऊ शकतो. सुश्रुत संहितेने गर्भाशयाचे विकार, मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी इतर काही औषधांसोबतच अशोकाचा उपयोग सुचविला आहे. त्याशिवाय डोळ्यांच्या विकारांत, मेंदूच्या विकारांत,सर्पदंशावर सुद्धा अशोक उपयोगी पडतो. कृमिविकार,कफ, व्रण-आन्त्रव्रण,  रक्ती मूळव्याध, तुटलेली हाडे सांधताना देखील अशोकाचा उपयोग होतो. वाग्भटाच्या अष्टांग हृदयात, धन्वंतरी निघण्टु,राज-निघण्टु,कायदेव निघण्टु या ग्रंथात अशोकाच्या औषधीय उपयोगांची चर्चा आली आहे. भावप्रकाश निघण्टु व निघण्टु-रत्नाकर या ग्रंथात अशोकाचे चिकित्सा पद्धतीतील योगदान चर्चिले आहे. योग रत्नाकर,भैषज्य रत्नावली या औषधीनिर्माणशास्त्राशी संबंधित ग्रंथांत अशोकाच्या झाडाची साल – चूर्ण स्वरूपात दुधासोबत,मधासोबत घ्यावी असे सुचविले आहे. अशोक हा स्त्रियांच्या अनेक प्रकारच्या रोगांवर उपयोगी पडतो. गर्भाशयाचे विकार, सम्प्रेरकासम्बंधीच्या तक्रारी,मासिकपाळी चे त्रास, अति रक्तस्राव होणे या आणि इतरही काही तक्रारींवर अशोकाचा वृक्ष म्हणजेच त्याची साल, कळ्या उपयोगी पडतात. अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अशोकापासून तयार होणाऱ्या औषधांचे वर्णन आढळते. त्यापैकी,अशोकघृत आणि अशोकारिष्ट ही आजही सर्रास वापरली जाणारी औषधे आहेत. रक्तप्रदरात उपयोगी पडून गर्भाशयाच्या तक्रारी दूर करणारा म्हणजेच पर्यायाने गर्भस्थापानेला मदत करणारा,गर्भाचे पोषण करणारा म्हणून अशोकाला पिंडपुष्य हे नावही रूढ झाले होते,असे आयुर्वेदीय ग्रंथांतून दिसते. या सगळ्या औषधांमध्ये अशोकाचा उपयोग इतर विविध वनस्पतींसोबत सांगितला आहे.

अशा प्रकारे अशोक वृक्ष प्राचीन काळापासून भारताच्या सांस्कृतिक परिघात मोलाची भूमिका बजावताना दिसतो. त्याच्याशी निगडीत असणारा विधी म्हणजे तरूण मुलींना अशोकाच्या झाडाशी जोडणारा पर्यायाने त्यांच्या आधी-व्याधी नष्ट होण्यासाठी मदत करणारा असा विधी मानला पाहिजे.आजच्या काळात,तरूण पिढीचा अशोकाशी बंध जुळावा म्हणून,आपल्या परिसरातील अशोकाच्या झाडांना ओळखणे,त्यांची गणना करणे,शक्य असेल तिथे तिथे खऱ्या अशोकाचे रोपण करणे, असे उपक्रम करता येतील.अशोकाच्या झाडाजवळ जाऊन त्याच्या कळ्या वेचणे आणि त्या कळ्यांचा-पानांचा उपयोग करून स्वतःला नटवणे-सजवणे,अशा खास तरुणाईला आकर्षित करतील अशा स्पर्धा देखील घेता येतील. अशोकाची शोकहारक शक्ती म्हणजे आजच्या तरुणीच्या तना-मनाचे सबलीकरण ! करीअरच्या मागे धावताना,आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आजच्या तरुणीला स्त्रीत्वाचा अर्थ समजावून देण्यसाठी अशोकाशी संबंधित विधींचा उपयोग होऊ शकतो. तसे प्रयत्न आज आवर्जून झाले पाहिजेत,नव्या युगाची नवी व्रते रचली गेली पाहिजेत !

समृद्धीच्या अथक पाठलागापायी शांतता-समाधान-निवांतपणा हरवून बसलेल्या,चिन्ता-काळज्यांनी काळवंडून गेलेल्या, आपल्या गावा-शहरांना,अशोकाच्या दुःखदैन्यनिवारक सकारात्मक शक्तीची  खरंच गरज आहे !

 

 

 

 

 

डॉ .प्रो. स्वाती द्रविड 

Postbox India 

संस्कृती धारा 


Leave a Reply

error: Content is protected !!