Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

shahaji raje samadhi – शहाजीराजे भोसले अभिवादन

1 Mins read

shahaji raje samadhi – शहाजीराजे भोसले अभिवादन

 

 

shahaji raje samadhi – शहाजीराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

शहाजी राजांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी मालोजीराजे व दिपाबाई ऊर्फ ऊमाबाई साहेब यांच्या पोटी झाला मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमतःफलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहात होते .मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दिपाबाई मालोजीराजे यांना दिली होती.नंतर त्यांचे नाव ऊमाबाई ठेवण्यात आले. त्यांना दोन मुले एक शहाजी व दुसरे शरीफजी
मालोजीराजे यांच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागिरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्ती ही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारापेक्षा अधिक प्रस्तुत झालेली होती. शहाजी राजांच्या आई उमाबाई या एक धाडसी , दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या .आणि त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते व वाढलेही होते .बालपणापासूनच राजकारण-समाजकारण त्यांना जवळून पाहता आले .त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होते. त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले होते .त्यामुळे ते फक्त योध्दा नसून त्यांचे मन साहित्य संगीत याकडेही आकर्षित झाले होते.
उत्तरेकडे आणि दख्खनमधे प्रचंड राजकीय उलथापालथी घडल्या त्यातच शहाजीराजांचे कर्तुत्व हे इतिहासात उजळून निघालेले दिसते . रणशौर्य हा शहाजीराजांच्या जीवनाचा जन्मजात आणि अविभाज्य गुण आहे .ह्या तरुण मराठा योध्याने ,वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी ,म्हणजे इ. स.१६२४ ऑक्‍टोबरमध्ये ,अहमदनगर जवळ भातवडीच्या टेकाड प्रदेशात दोन सुलतानी महासत्तांचा एकाच दिवशी, एकाच वेळी , जंगी पराभव केला. दिल्लीच्या जहांगीर बादशहाची फौज एकवटून निजामशाही बुडवण्यासाठी महाराष्ट्रावर लोटली होती. ती निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजांनी , आपल्या त्या मानाने अगदीच कमी असलेल्या फौजेनिशी , अत्यंत कल्पकतेने प्रचंड मोठ्या फौजेचा कमीत कमी वेळात संपूर्ण पराभव केला.
शहाजी राजांच्या लष्करी कर्तृत्वाचा प्रदेश ! सह्याद्रीचा यात येणारा डोंगराळ भाग ,जंगल भाग , आणि नद्यांची खोरी; शहाजीराजांनी युध्दाच्या ,विशेषत: गनिमी काव्याच्या हुतूतूसाठी, आट्यापाट्यासाठी आणि लपंडावासाठी वापरली.त्यांचे यौध्दिक सामर्थ ,त्यांनी ह्या भौगोलिक अतिबिकट अशा स्थळांमधेच बहुतांशी वापरले. म्हणजेच निसर्गदत्त, भौगोलिक ,अजिंक्य प्रदेशाचा त्यांनी मोगलांसारख्या गडगंज श्रीमंत, पण आक्रमक गलेलठ्ठांशी लढण्यासाठी उपयोग केला. ह्या गलेलठ्ठांच्या स्थूल तोफखान्याला ,हत्तीच्या झुंडीना आणि,जनानखाने सांभाळीत केवळ दिवसा उजेडी जमेल तेवढ्या लढाया करणाऱ्या ,श्रीमंत मोगलांच्या दाट गर्दीला महाराजांनी पाच वर्षे कोल्ह्याच्या कौशल्याने आणि चित्त्याच्या चपळाईने शहाजीराजांनी खेळिवले.
त्यांच्या शौर्याने आणि पराक्रमाने दोन बादशाही सत्तांचा पराभव सह्यप्रदेशातील एक तरुण ,आपल्या थोडक्या फौजेनिशी, थोडक्या वेळात , एकाच वेळी करतो ,हा इ.स. ११०० ते १६०० ह्या पाचशे वर्षातील भरतखंडातला एक विलक्षण चमत्कार होता . गनिमी काव्याचे युद्धतंत्र अत्यंत कल्पकतेने वापरून महाराजसाहेब शहाजीराजे यांनी हा चमत्कार घडवून दाखवला .
बारकाईने अभ्यास केला तर
आपल्या हेच लक्षात येईल की,राजकारणातले आणि रणांगणावरले ,छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राचार्य होते ते शहाजी राजे.
ह्या सर्व राष्ट्र उभारणीचा पाया कोणी घातला , राष्ट्रीय चारित्र कोणी घडविले त्याचा प्रारंभ महाराज साहेब शहाजीराजे यांनी केला. भोसले घराण्याची प्रतिष्ठा , नावलौकिक , शौर्याची परंपरा यांचा वारसा शहाजीराजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झाला. वयाच्या बाराव्या वर्षी सन १६४१ झाली छत्रपती शिवाजीराजे आपल्या मातोश्रीसह बंगळुरास पित्याच्या भेटीस गेले तेथे एक दोन वर्षे राहिले हा कालखंड अल्पसा असला तरी शिवाजी राजांच्या संस्कारक्षम वयातील त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणाऱा महत्त्वाचा घटक ठरला. बंगलोरहून छत्रपती शिवाजीराजे आपल्या मातोश्रीसह महाराष्ट्रात परतले ते असे संस्कार घेऊनच. हे संस्कार होते पराक्रमाचे,मुत्सद्दीगिरीचे आणि इतिहासातून काही शिकण्याचे !शहाजी राजांचे स्थान आदराचे आहे तर राजमाता जिजाऊंचे स्थान आदरयुक्त श्रद्धेचे आहे.
मराठी मातीत स्वराज्य निर्मितीचा पाया प्रथमतः शहाजीराजांनीच घातला. आपले स्वप्न आपल्या मुलाच्या हातून साकार करून घेणारा हा नवा पायंडा जगासमोर ठेवणारा हा राजा होता.स्वराज्य स्थापनेची स्फुर्ती जिजाऊ शिवरायांना देणारा व स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून शहाजीराजांचे योगदान लक्षणीय आहे.
भातवडीच्या युद्धामुळे शहाजी राजांची प्रतिष्ठा खूप वाढली. त्यांना वगळून आता दक्षिणेत कोणतेही राजकारण अशक्य होते .भातवडीच्या लढाईचे खरे शिल्पकार शहाजी राजेच होते.
अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा, अफझलखानाच्या दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज विजापूर बाहेर खडी ठेवली होती.
पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. shahaji raje samadhi माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

स्वराज्य संस्थापक शहाजी राजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: