Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

savitribai fule – १ जानेवारी स्री शिक्षणाचा उदय

1 Mins read

savitribai fule – १ जानेवारी स्री शिक्षणाचा उदय

 

 

savitribai fule – महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई

 

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई या दोघा पती-पत्नीने स्त्री शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये केलेले कार्य अभिमानास्पद आहे. संपूर्ण स्त्री जातीला गर्व व त्यांचा आदर्श वाटावा असेच या दोघांचे कार्य आहे .सामाजिक जीवनातील प्रत्येक चळवळी मागे सावित्रीबाईंनी आपले फार मोठे योगदान दिलेले आहे. ज्योतिराव फुले व सावित्रीबाई यांनी पहिली मुलींची शाळा काढली .या शाळेमध्ये ज्योतिराव गुरुजी व सावित्रीबाई विद्यार्थिनी होत्या. शिक्षण कसलं ,तो एक महायज्ञ होता . साक्षात सरस्वतीची आराधना होती .प्रस्थापितांच्या विरोधात फुंकलेले रणशिंग होते !

ते तर एका क्रांतीज्योतीचे पेटण होतं. रूढीग्रस्त समाजाने त्यांची निंदा केली, अंगावर शेणपाणीही ओतले, पण विझवण्यासाठी ही क्रांतिज्वाला प्रज्वलित झालीच नव्हती ना ? अतुलनीय धैर्याचा महासागर,पराकोटीची ज्ञानसाधना म्हणजे सावित्रीबाई. अगदी टोकाचा जीवघेणा संघर्ष म्हणजे जोतिबा आणि सावित्रीबाई. उपेक्षितांसाठी चंदनासारखे झिजणार्या सावित्रीबाई स्वातंत्र्य, समता ,बंधुता, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान ,साक्षरता यासाठी आपल्या एका आयुष्यात जेवढे प्रचंड ,उत्तुंग कार्य केलं तेवढं कार्य आम्हाला अनेक जन्म घेऊनही करता येणार नाही.

इ.स.१८४८ मध्ये पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. शाळा सुरू करण्यामध्ये असंख्य अडचणी आल्या होत्या .जोतीराव – सावित्री यांनी शिक्षणाच्या कार्यात आपले जीवन समर्पित करण्याचे ठरवले होते. अहमदनगर येथे जाऊन मिस फॅरार नावाच्या एका अमेरिकन बाईंनी काढलेली मुलींची शाळा ते पाहून आले होते. तिथल्या कामाचा व्यवस्थापनाचा त्यांनी बारीक-सारीक अभ्यास केला .त्यांच्याकडून शाळा चालवण्याचे सविस्तर मार्गदर्शन घेतले.

फॅरार मॅडमनी त्यांना सांगितले की, “लहान मुलांना आपण जसे लहानपणी वळण लावून त्यांच्यावर संस्कार करू त्याचप्रमाणे त्या सवयी मुलांच्या अंगवळणी पडतात .तसेच त्या संस्कारातच त्यांच्या पुढील शिक्षणाची व भवितव्याची बिजे असतात. म्हणून स्त्रियांना शिक्षण मिळालेच पाहिजे. एक स्त्री सुशिक्षित झाली तर सारे कुटुंब सुशिक्षित होईल. पर्यायाने सर्व समाज सुशिक्षित होईल!” फेराॅर मॅडमच्या या विचारसरणीचा जोतीराव व सावित्रींच्या वरती अत्यंत अनुकूल परिणाम झाला की त्यांनी स्त्री शिक्षणाच्या हट्टासाठी आपले सर्व उर्वरित आयुष्य त्यासाठी खर्च केले.

पुणे येथे जोतीरावांनी जी शाळा सुरू केली ती भिडे नावाच्या ब्राह्मण गृहस्थांनी बिनभाड्याची जागा दिली होती.आपला वाडा शाळेसाठी देऊन वरती १०१ रूपयांची देणगीही दिली होती. भिडे हे गृहस्थ अतिशय दयाळू व परोपकारी होते. याच भिड्यांच्या वाड्यात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला. सावित्रीबाई पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून या शाळेत कार्यरत झाल्या .पहिली भारतीय स्त्रीशिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचे नाव इतिहास सुवर्णअक्षरांनी नोंदवून ठेवेल.

माणसांच्या, कुटुंबाच्या विकासासाठी शिक्षण हा मूलभूत विचार सव्वाशे वर्षांपूर्वी मांडणाऱ्या ज्योतिराव फुले व savitribai fule सावित्रीबाई हे पहिले शैक्षणिक तज्ञ होते. स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकेल व प्रगती करेल ,एक नव्हे तर दोन्ही घरांचा ती उद्धार करू शकेल हे समीकरण सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांच्या मनात पक्के बसले होते.शेकडो वर्षाच्या शृंखला तोडून ज्योतिबा व सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्यात प्रवेश केला .ज्योतिरावांच्या पाठिंब्यामुळे सावित्रीबाई गोरगरीब स्त्रियांच्या उद्धारासाठी बाहेर पडल्या. त्यांच्या या कार्याने भारतात नव्याने परिवर्तन घडून नवीन युगाची सुरुवात झाली .सावित्रीबाईंनी निवडलेला मार्ग अत्यंत खडतर ,निसरडा व समाजाच्या अत्यंत विरोधातील होता. एका स्त्रीने घराबाहेर पडून ज्ञानदानाचे उत्तम कार्य करणे हे पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांना कधीच रुचणारे नव्हते. मुलींची शाळा सुरू होताच सनातनी ब्राह्मणांनी धर्म बुडाल्याची ओरड सुरू केली .स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही हा अधर्म आहे.

धर्माच्या विरोधातील हे मोठे कारस्थान आहे अशी ओरड सनातन्यांनी सुरू केली होती .स्त्री शिकली तर ती कुमार्गाला लागेल ,जात, धर्म बुडेल; कलियुग आले धर्म बुडाला अशा ब्राम्हणी काव्याला फुले दांपत्याने अजिबात भीक घातली नाही. उलट मिसेस मिचेल त्यांनी सावित्रीबाईंना निग्रोंची गुलामगिरी नष्ट करणारे टाॅमस काॅकर्सन यांचे चरित्र वाचण्यासाठी दिले. त्याचा अत्यंत चांगला परिणाम सावित्रीबाईंवर झाला. निग्रोवर होणारे अन्याय, अत्याचार,त्यांचा छळ , त्यांच्याविरोधात तेथील समाजसुधारकांनी उघडलेली मोहिम आपणही आपल्या देशात शूद्र व स्त्रिया यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध का उघडू नये याबद्दल सावित्रीच्या मनामध्ये काहूर उठू लागले. त्यांनी आपले विचार, आपली व्यथा जोतीरावांच्यापुढे मांडली. जोतीराव तर सच्चे हाडाचे समाजपरिवर्तनाचे पुरस्कर्ते होते.

त्यांनी स्त्री शिक्षण व दलित उद्धारासाठी सावित्रीच्या कार्याला प्रेरणा व मदत देण्याचे मान्य केले.
पुण्यात फक्त एकच शाळा उघडून फुले दांपत्य थांबले नाही. त्यांनी एका मागून एक 18 शाळा मुला मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी सुरू केल्या.अवघ्या चार वर्षात पुण्यातच सात शाळा सुरू झाल्या. पहिली भिडे वाड्यात,दुसरी महारवाड्यात, तिसरी चिपळूणकरांच्या वाड्यात, चौथी नाना पेठेत ,पाचवी रास्ता पेठेत, सहावी वेताळ पेठेत,सातवी कसबा पेठेत. पुण्याच्या बाहेरही शाळा उघडल्या.
दलितोध्दाराचा श्रीगणेशा म्हणून सावित्रीबाईनी संत चोखा मंदिरात शाळा सुरू केली. सुरुवातीला फक्त अस्पृश्य जातीची फक्त नऊच मुले आली. मुले शाळेकडे फिरकेनासी झाली. त्‍यावेळी सावित्रीबाईं दलितांच्या वसाहतीत जाऊन घरोघरी सर्वांना भेटू लागल्या.

लोकांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागल्या.परंतु सर्वांना वाटे की आपण खालच्या जातीतले आहोत, आपली लेकरे – बाळे शिकली तर आपल्याला वाळीत टाकतील, आपल्याला गाव सोडायला लागेल. आपल्या बरोबर कोणीही सोयरीक करणार नाही. आपली पोरे शिकली तर ती काय साहेब होणार हायती काय? पोर शिकली तर त्यांचं वाटुळ होऊन ते सात पिढ्या नरकात जातील. या त्यांच्या विचाराने जोतिबा आणि सावित्रीबाई अतिशय निराश होत.सावित्रीबाईंच्या लक्षात येई की , त्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धेच्या व रुढी परंपरेच्या बेड्या आहेत. या जोखडातून त्यांना बाहेर काढायला हवे. सावित्रीबाईंनी सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणावरील एक कविता म्हणून दाखविली.

सर्वांना पटेल अशा विचारात savitribai fule सावित्रीबाईंनी शिक्षणाची आवश्यकता कथन केली व हळूहळू मुले शाळेत प्रवेश करू लागली. ज्योतिराव सावित्रीबाईंचे शैक्षणिक प्रगती पाहून सनातनी मंडळी अधिकच चिडली. त्यांनी ज्योतिरावांचे घर गाठून त्यांचे वडील गोविंदराव यांना जोतिबा आणि सावित्रीबाई यांचे शैक्षणिक कार्य धर्माला कसे घातक आहे हे पटवून सांगितले. त्यांच्यावर सामाजिक दडपण आणले. बहिष्काराची भीती घातली .बिचारे गोविंदराव घाबरले. त्यांनी ज्योतिराव – सावित्रीबाईंना घरातून बाहेर काढले. या संकट समयी महात्मा फुले यांचे जिवलग मित्र उस्मान शेख मदतीला धावून आले. त्यांनी गंजपेठेतील आपल्या राहत्या घरात फुले दाम्पत्याला आश्रय दिला.

उस्मान शेख यांनी फुले पती-पत्नी यांना आपल्या घरात फक्त राहण्याची जागा दिली नाही तर ,संसाराला लागणारी थोडी भांडीकुंडी सुद्धा दिली. उस्मान शेख यांची बहिण फातिमा शेख फुले दांपत्याच्या शाळेतील दाखला घेणारी पहिली विद्यार्थिनी व या शाळेत शिक्षिका म्हणून प्रशिक्षित झालेल्या पहिला मुस्लिम महिला होत्या. फातिमा शेख या सावित्रीबाई बरोबर उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षिका ठरल्या. सावित्रीबाईंच्या जोडीने स्त्री शिक्षणाची ज्योत पुढे येणाऱ्या फातिमा शेख यांचे नाव घ्यावे लागेल. सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे घराच्या बाहेर निघून गेले. सावित्रीबाईंनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली व भारतातील पहिली महिला शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला .सावित्रीबाई आपले घर प्रपंच सांभाळून समाजाचा प्रपंच करत होत्या. सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या सुधारणेसाठी उदारपणे जीवित समर्पित करणारी पहिल्या महिला ठरल्या.

आज ही पोस्ट टाकण्याचे कारण म्हणजे एक जानेवारीला आपण नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, ज्या महात्मा जोतिबा फुले व ज्ञानाई savitribai fule सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारीला भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली होती.या फुले पती पत्नीच्या योगदानामुळे स्रिया शिकून पुढे आल्या .हे आपण विसरून,ईंग्रजी संस्कृतीचे अनुकरण करून नवीन वर्ष साजरे करत आहोत याचेच दुःख वाटते.फुले दांपत्याचे कधिही न फिटणारे ॠण आपल्यावर करून ठेवले आहेत,हे कधिही विसरता कामा नये.

 

महात्मा जोतिबा फुले व ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांना आमचा मानाचा मुजरा 

 

लेखन
डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

%d bloggers like this: