Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Sambhaji nagar – राजमस्तकाचा आदेश !

1 Mins read
  • Sambhaji nagar - राजमस्तकाचा आदेश !

राजमस्तकाचा आदेश !

कै. पू.भा.भावे

फाल्गुन अमावस्या १६८९,
काळी काळी रात्र होती, तुळापूरच्या कुठल्याश्या रानात कुठल्याश्या नागफणीत एक रक्तबंबाळ मस्तक लोळत पडले होते.त्या मस्तकावर आज राजमुकुट नव्हता. त्या मस्तकावर आज सुवासिक जलाचा अभिषेक झाला नव्हता.उलट ते मस्तक धुळीने आणि रक्ताने माखलेले होते आणि त्यावर नागफणीच्या काट्यांचा शिरताज चढला होता.

मृदु शय्याप्रकारचा व छत्रचामरांचा त्या मस्तकाने त्याग केला होता.ज्या भूमीच्या पालनाचा भार त्या मस्तकाने आजवर वाहिला, त्या भूमीच्या आसऱ्यास अव्याज अकृत्रिमतेने ते मस्तक आज गेले होते.त्या मस्तकावर आता चवऱ्या ढाळल्या जात नव्हत्या,अभिषेक होत नव्हते, छत्रचामरे डोलत नव्हती, हे खरे! ते मस्तक आज राजमंचकवर पहुडले नव्हते, हेही खरे!

पण तरीही असला आराम, असले सुख त्या मस्तकाला आजवर कधीही लाभले नव्हते, चंदनाच्या उट्या आणि अंगरागाची विलेपने त्यांनी त्या मस्तकाला जे मांगल्य दिले नव्हते, ते मांगल्य आज रुधिराच्या लेपनाने व धुळीच्या पुटांनी त्याला दिले होते.

त्या मस्तकाचा उद्धार झाला होता.सारी बंधने संपली होती. तेथे कवी कलश नव्हता, येसूराणी नव्हत्या, झुल्फिकारखान नव्हता,आलमगीर नव्हता.तेथे राजमहाल नव्हता,राजमंचक नव्हता.तेथे फक्त महाराष्ट्र-माती होती आणि तिच्या मांडीवर ते मस्तक लोळत पडले होते.एक वेगवान व आक्रमक आयुष्याचा तो अकल्पित , पण अभिमानी शेवट होता.मृत्यूतून आज चिरजिवन निर्माण झाले होते.

आज महाराष्ट्राच्या मातीत हौत्यातम्याची फुलवेल बहरली होती.ऐहिक अवतार संपल्यावर आज अवतारकार्याचा आरंभ झाला होता. सिंहासन मोकळे केल्यावर आज सिंहसनाचा लाभ झाला होता.सत्ता संपुष्टात आल्यावर आज अबाधित सत्तेची सुरवात झाली होती.नेत्र फुटून गेल्यावर आज दिक्कालाचा भेद घेणारी दृष्टी आली होती.जिव्हाछेदन झाल्यावर आज वाणी अमोघ बनली होती.आणि राज्यावर नसताना न मिळाल्येल्या राज्याचा आता आरोहण समारंभ होता.

ते अमानुष अद्भुत पाहण्यासाठी आभाळात तारे मिचमीचत करीत होते.तुळापूरच्या साऱ्या राया पुलकित झाल्या होत्या. सारी वने पुलकित झाली होती.महाराष्ट्राच्या पाणवठ्यावरचा ओलावा घेऊन शक्य त्या निरवतेने वारे वाहत होते.
मोगलांच्या छावणीत मशालींचा उजेड पेटत होता.तेथील वातावरण विजयाच्या डोल्यानी धुंद झाले होते.तेथे दिन दिन आणि वाद्यांचा गजर चालला होता. रणमर्द मराठ्यांच्या राजाला धूळ चारल्याविषयी, मराठ्यांचे राज्य नामशेष केल्याविषयी तेथे उत्सव चालला होता.

म्लेंच्छ शिखानष्टांचा तो उत्सव पाहून तुळापूरची सारी वने हसली,तुळापूरच्या साऱ्या राया हसल्या, निवडुंगाचा तो फड हसला आणि त्या फडात पडलेले ते मस्तकही हसले.आणि नंतर रणमर्द मराठ्यांच्या छत्रपती संभाजीराजाचे ते विडंबीत पण सन्मानित,मृत पण चिरंजीव, विद्रुप व सुंदर मस्तक बोलू लागले—-

“मूर्खांनो ,हे उत्सव कशासाठी? हा आनंद काय म्हणून? या विजय नादाचे कारण काय? माझे नेत्र नष्ट केल्याविषयी हा आनंद आहे काय?माझी जिव्हा छाटल्याविषयी हा उत्सव आहे काय? माझा शिरच्छेद केल्याविषयी हा हे विजयनाद आहेत काय?
तसे असेल, तर माझ्या मूर्ख शत्रूंनो, हा आनंद व्यर्थ आहे.हा उत्सव वृथा आहे.हे विजयनाद निष्कारण आहेत.आज शिवपुत्र संभाजी मेला नाही- आज आलमगिराचे आयुष्य भरले आहे.आज मराठी राज्य बुडाले नाही,तर आज मोगलाईचा अंत होण्यास सुरुवात झाली आहे.आज हिंदुराष्ट्र मरणोन्मुख झालेले नाही ,तर त्या राष्ट्राचे दुश्मन मरणोन्मुख झालेले आहेत.

माझ्या मूर्तीभंजक आणि कर्मनष्ट म्लेंच्छ शत्रूंनो , तुम्ही मला मरण द्यावयास आलात आणि स्वतःचे मरण घेऊन गेलात.तुम्ही अमंगल करावयास आलात आणि मंगल करून गेलात.
कारण आज संभाजीच्या अमर अवतारकार्यास सुरवात झाली आहे.

आज शरीराने संभाजी मेला आणि महाराष्ट्र मातेचा संभाजी जिवंत झाला, छत्रपती शिवरायांचा पुत्र जिवंत झाला, म्लेंच्छ मूर्तीभंजकांचा वैरी सजीव झाला आहे.
माझ्या मूढ दुश्मनांनो ! माझा ज्यांनी तिरस्कार केला ते माझ्या मरणावर प्रेम करतील.बंद असलेल्या मनांची कवाडे धडाधड खुलतील. हृदयाहृद्यातुन आता संभाजीच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होईल.महाराष्ट्रातील त्या क्षात्र कुलकामिनी आता माझ्याच वीरमरणाच्या कथा आपल्या लहान बाळांना आळवून सांगतील.
छत्रपती संभाजीच्या या नव्या अवताराबद्दल अपरंपार आदर असेल, हुतात्मा संभाजीसाठी लोभ असेल, अमर संभाजी विषयी प्रेम असेल.

माझ्या मूर्ख दुश्मनांनो, जिवंत संभाजी तुझा जेवढा शत्रू नव्हता, तेव्हढा मृत संभाजी तुझा शत्रू आहे. सजीव संभाजीशी वैर करणे जितके सुलभ होते , तेवढे मृत संभाजीशी वैर करणे सुलभ नाही; कारण आज संभाजीला महाराष्ट्र मातीने आपला म्हंटले आहे. आज तिने त्याला पोटाशी घेतले आहे. स्वतःच्या रक्ताने आणि बांधवांच्या अश्रूंनी आज संभाजीला राज्याभिषेक झाला आहे.आज सर्वदूर संभाजीबद्दल प्रेम आहे आणि आदर आहे.

माझ्या दुश्मना! तुला खोटे वाटते ? तर विचार तर मग त्या संह्याद्रीच्या गड कोटानां ,कड्या कपारीनां, मराठी मातीला आणि माझ्या शूरवीर मावळ्यांना!
सारे तुला सांगतील – संभाजीच्या मरणाने संभाजीला धन्य केले आहे.संभाजीच्या मरणाने महाराष्ट्र धर्माला धन्य केले आहे.संभाजीच्या मरणाने आमचे त्याग कारणी लागले आहेत.संभाजी मेला पण फितूर झाला नाही.संभाजी मेला पण धर्मभ्रष्ट झाला नाही. संभाजी कधीही वाकला नाही.बेदरकार धुंदीने संभाजी हौतात्म्याचे खेळ खेळला. बेछूट सहजतेने त्याने मृत्यूचे शूल उचलले. मग्रूर उन्मादाने त्याने मृत्यही कवटाळला!

शुचिर्भूत शरीराच्या पण मुर्दाड मनाच्या माणसापेक्षा प्रज्वलंत मनाचा माणूस फार मोठा!मृत्यूच्या फुंकरीने मेलेली राख उडून गेली आणि संभाजीचे जळते अंतःकरण आम्हाला दिसले.मरणाच्या मापदंडाने मापल्यावर संभाजीची उत्तुंग उंची आम्हाला कळून आली.संभाजीने देशाला दगा दिला नाही.धर्माशी द्रोह केला नाही.क्रूर हालपेष्टाना तोंड देतानाही त्याचे मन खचले नाही.त्याची मग्रूर उत्तरे बंद झाली नाहीत.संभाजी खरा मस्तवाल होता.

संभाजीची मग्रुरी ही विलासी वैभवाने आलेली तोंडाळ मग्रुरी नव्हती. ती विपत्तींनाही वेडावणारी जातिवंत मग्रुरी होती.तोंडाळ गोडवा दाखवणे सोपे आहे, शेळपट संभावीतपणा दाखवणे सुलभ आहे, पण असली मग्रुरी दाखवण्यास लोकोत्तर धैर्य असावे लागते. या मग्रूरीची परीक्षा एकच मरण !
या मग्रूरीची निकष एकच मरण !

पण मग्रूरीच्या त्या अंतिम दिव्यातून ,त्या कठीण परीक्षेतून संभाजी उजळ मुखाने बाहेर पडला.संभाजी एका ध्येयासाठी हुतात्म्यांच्या मरणाने कामी आला. संभाजीला महाराष्ट्राने हृदयात घेतले आहे,मस्तकावर धारण केले आहे!महाराष्ट्राला एक नव्या व्रताची दीक्षा देऊन संभाजी अमर झाला आहे!

हिंदुद्वेषी आलमगिरा!ऐक!संभाजीला महाराष्ट्राने हृदयात घेतले आहे,मस्तकावर धारण केले आहे!महाराष्ट्राला एक नव्या व्रताची दीक्षा देऊन संभाजी अमर झाला आहे! संभाजीला महाराष्ट्राने हृदयात घेतले आहे,मस्तकावर धारण केले आहे! संभाजी अमर झाला आहे!

अरे औरंग्या महाराष्ट्राच्या मातीला दुःख देऊन तू आता येथून परत जाऊ शकणार नाहीस!सह्याद्रीला हे खपणार नाही.महाराष्ट्राच्या नद्यांना हे खपणार नाही.महाराष्ट्राच्या वास्तुदेवतेला हे रुचणार नाही.पारतंत्र्य आणि विश्वासघात यांना या भूमीत स्थान मिळणार नाही.

ती वाद्ये थांबावं! हे म्लेंच्छ सुलताना स्वतःची मरणघटका साजरी करण्यासाठी वाद्ये वाजवीत नसतात.ते दीन दिन चे जयघोष बंद कर! शत्रूचे चिरंजीवन उद्घोघोषित करण्यासाठी जयनाद करीत नसतात.

कारण माझ्या मूर्ख क्रूर दुश्मना तुला ठाऊक नसेल की आज माझा नवा अवतार झाला असून तुझं मरण मात्र घटका पळानी जवळ येत आहे. तुझ्यासाठी प्रेतगती निर्माण होत आहे ! हर हर महादेव !

देश धरम पर मिटने वाला।
शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी।
एक ही शंभू राजा था।।

प्रतिभावंत कै. पू.भा.भावे यांचा संपादित लेख.

Leave a Reply

error: Content is protected !!