raghunath mashelkar – डॉ.रघुनाथ माशेलकर अभिष्टचिंतन
raghunath mashelkar – डॉ.रघुनाथ माशेलकर अभिष्टचिंतन
भारतीयांचा असणारा परंपरागत हक्क अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पुराव्यांसह मांडून त्यांची एकस्व (पेटंट) मिळवून देणारे डॉ रघुनाथ अनंत माशेलकर,यांचे आज अभिष्टचिंतन . हळद, बासमती तांदूळ व कडुनिंब याचे पेटंट त्यांनी मिळवून दिले. माशेलकर यांचा जन्म माशेल (गोवा) येथे सामान्य गरीब कुटुंबात झाला. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण अप्पर खेतवाडी येथील प्राथमिक शाळेत तर पुढील शिक्षण युनियन हायस्कूलमध्ये झाले. ते महाराष्ट्र राज्यात सर्व विद्यार्थ्यांत अकरावा क्रमांक मिळवून एस्. एस्. सी. उत्तीर्ण झाले (१९६०). त्यांनी उच्च शिक्षण जयहिंद महाविद्यालय व युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या ठिकाणी घेतले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी १९६६ मध्ये रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी पीएच्.डी पदवीचे संशोधन तीन वर्षांत पूर्ण केले (१९६९). त्यांनी काही काळ युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्ड (लंडन) येथे व्याख्याता म्हणून काम केले. तसेच यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले.
बौद्धिक ज्ञानसंपादनाच्या हक्काविषयीची (पेटंट) धोरण याबाबत माशेलकर यांचे योगदान मोठे आहे. पेटंट ऑर पेरिश (perish) असा इशाराच त्यांनी दिला होता. हळद, बासमती तांदूळ व कडुनिंब यांवरील संशोधन आणि त्यांवर भारतीयांचा असणारा परंपरागत हक्क अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पुराव्यांसह मांडून त्यांची एकस्व (पेटंट) पाश्चिमात्यांच्या विशेषत: अमेरिकेच्या हातात जाऊ दिली नाहीत. ‘व्यवसायाभिमुख संशोधन’ या तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘ज्ञान’ ही संपत्ती आहे, तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीर रीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांचे स्पुट लेखन विपुल आहे. त्यांनी शंभराच्या वर शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सु. २० पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ते उत्तम वक्तेही आहेत. गरीब-गरजू बालकांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेकविध योजना आपल्या व्याख्यानांतून सांगितलेल्या आहेत. त्याकरिता त्यांनी ‘रीड इंडिया’ ही मोहीम हाती घेतली आहे.
जागतिक स्तरावरील माशेलकर यांचे वैज्ञानिक कार्य लक्षात घेऊन रॉयल सोसायटीने त्यांचा दि. १७ जुलै १९९८ रोजी सन्मान केला. अमेरिकन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या जगत्विख्यात संस्थेवर माशेलकरांची मानद सल्लागार म्हणून निवड करण्यात आली (मे, २००५). हा मान मिळविणारे ते केवळ सातवे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. विश्वचरित्र संशोधन केंद्र, पर्वरी (गोवा) येथे संपादित झालेल्या मराठी विश्वचरित्र कोशाच्य प्रकल्प संस्थेचेही ते सन्माननीय अध्यक्ष होते. सध्या डॉ. माशेलकर कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचे महासंचालक आहेत.
माधव विद्वांस ( संदर्भ - मराठी विश्वकोश )