Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

औदुंबर

1 Mins read
  • औदुंबर

औदुंबर

 

 

चित्रात एक नदी आहे. नदीचे जे दोन तीर आहेत त्यापैकी एका तटावर म्हणजेच ऐलतटावर स्वतः त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे “बालकवी” बसले आहेत. ते जेथे बसले आहेत तो भाग मनुष्यवस्तीचा आहे. मुबलक मनुष्यवस्तीचा आहे आणि पैलतटावर कमी मनुष्यवस्ती आहे.

ऐलतटावर आणि पैलतटावर दोन्हीकडे हिरवेगार मळे पसरलेले आहेत. निरखून पाहता ती हिरवीगार बेटे आहेत. एकमेकांशी जोडलेली आहेत. समोर पैलतटावर दूरवर एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवर चार-पाच घरांचं एक चिमुकलं गाव आहे. तो संपूर्ण परिसर हिरवागार आहे आणि तो बेटा-बेटांनी शेतमळ्यांनी वसलेला आहे. त्यांमधून निळा-सावळा झरा वाहतो आहे.इतकं सुंदर निसर्ग काव्य फक्त बालकवीच लिहू शकतात.

परंतु त्या टेकडीवरील गर्द हिरव्या रानातून येणारी नागमोडी पायवाट चक्क पांढऱ्या रंगाची आहे. बालकवींच्या कोणत्याही काव्यात आपल्याला एक मनमोहक, अल्हाददायक रंगसंगती आढळते. त्यांचा मराठी आणि संस्कृत भाषांवर पगडा होता. White या इंग्रजी शब्दाला मराठीत सफेद आणि पांढरा असे दोन पर्यायी शब्द आहेत. बालकवींनी ह्या कवितेत हेतुपुरस्कर पांढरा हा शब्द वापरला आहे. “सफेद” रंग हा शुभ गोष्टींचे प्रतीक आहे तर “पांढरा” रंग हा अशुभ गोष्टी दर्शवितो.

वास्तविक आयुष्यातील “पायवाट” म्हणजे हिरव्या शेतातून चालत असताना सततच्या चालण्याने शेताचा काही भाग दबला जातो. कालांतराने त्यावरील छोटी लव्हाळी नष्ट होऊन तांबड्या किंवा ब्राऊन (Brown) रंगाची पायवाट तयार होते. येथे कवी “पायवाट” नुसती “पांढरी” म्हणून थांबत नाही तर ती अडवी तिडवी आहे असेही म्हणतो. हे जे काही चाललं आहे आहे ते सरळ मार्गाच्या पलीकडलं आहे आणि अतर्क्यही आहे कारण ती हिरव्या कुरणांतून “काळ्या डोहाकडे” चालली आहे. पुन्हा अशुभ !

कवी येथे हे सांगू इच्छितोय की ह्या पांढऱ्या पायवाटेवरून जाणारी व्यक्ती टेकडीवरील आपल्या घरांकडे न जाता काळया डोहाकडे जाऊ पाहतेय. ह्या डोहाच्या काठावर एक भलामोठा औदुंबर वृक्ष आहे. तो एवढा मोठा आहे की त्याची मुळे ह्या डोहाच्या पाण्यात पसरलेली दिसतायत. ह्या औदुंबर वृक्षाच्या सावलीमुळे किंवा छायेमुळे ह्या डोहाच्या पाण्यावर काळी छायाच पसरलेली दिसतेय.

ज्यांना बालकवींचे संपूर्ण व्यक्तिगत आयुष्य माहिती आहे, त्यांना या कवितेमध्ये दडलेला सुप्त अर्थ समजणे कठीण जाणार नाही. बालकवींचे संपूर्ण आयुष्य हे अनेक त्रासदायक गोष्टींनी व्यापलेले होते. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्यातूनच या जगापासून दूर जाण्याची वृत्ती वाढत गेली.

बालवयातच निसर्ग काव्यां मुळे त्यांना जनमानसात अमाप प्रसिद्धी मिळाली, परंतु आर्थिक सुबत्ता मिळाली नाही. एकीकडे “श्रावण मासी हर्ष मानसी” किंवा “आनंदी आनंद गडे” किंवा “फुलराणी” किंवा “तू तर चाफेकळी” इत्यादी मनोरम्य निसर्ग काव्ये लिहिणारा आणि वयाच्या सतराव्या वर्षी बालकवी ही उपाधी पहिल्या मराठी कविसंमेलनात मिळविणारा हा कवी अनेक गूढ काव्येही प्रसवत होता‌. त्यांनी आपल्या विमनस्क वागणुकीमुळे अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची वदंता आहे. आपण जर लक्ष्मीबाई टिळकांच्या वाङमयाचा सखोल अभ्यास केला तर टिळक दाम्पत्यांच्या या मानसपुत्राबद्दल, बालकवीं बद्दल त्यांनी नमूद केलेले अनेक संदर्भ आढळतात. यावरून असेही वाटते की बालकवी हे एक दुभंगलेले व्यक्तिमत्व होते. आत्यंतिक आनंद आणि अपार दु:ख एकाच वेळी हा कवी आपल्यापाशी बाळगून होता. बालकवींचा जो दुर्दैवी अंत (रेल्वे अपघात) वयाच्या २८व्या वर्षी झाला तो अपघात होता की आत्महत्या होती याबद्दल खात्रीशीर माहिती नाही.

या पार्श्वभूमीवर जर आपण “औदुंबर” या काव्याचं, गूढ काव्याचं रसग्रहण करू लागलो तर एका वेगळ्याच दृष्टीने हे काव्य आपल्यासमोर येते.

ऐलतटावर पैलतटावर
हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो
बेटा-बेटातून

बालकवी ज्या मनुष्यवस्ती मधून ऐलतटावरून ह्या पैलतटावरील चिमुकल्या चार घरांच्या वस्तीच्या गावाचे निरीक्षण करतात तेव्हा त्यांनी आपण ह्या आपल्या ऐलतटावरील मनुष्यवस्तीपासून दूर आहोत हे येथे उद्धृत केले आहे. आपलं जग दु:खाने भरलेलं आहे. त्यातून येणाऱ्या डिप्रेशनमुळे ते निसर्ग काव्यांत आपला आनंद शोधीत होते. उपरोक्त पंक्ती हे एक अप्रतिम निसर्ग वर्णन आहे.

चार घरांचे गांव चिमुकले
पैल टेकडीकडे,
शेतमळ्यांची दाट लागली
हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयातुनी
अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणां मधुनी चालली
काळ्या डोहाकडे

समोर त्यांना जे टेकडीवरील चिमुकले गांव दिसते आहे, ते काहीसे गूढ आहे. जरी त्या गावांमधील हिरव्यागर्द बेटा-बेटांमधून निळासावळा झरा वाहत असला तरी टेकडीवरून येणारी पायवाट ही अशुभ गोष्टींची निदर्शक आहे. आणि ती पाढरी पायवाट काळ्या डोहाकडे येऊन जेथे मिळते आहे तेथे औदुंबराच्या छायेमुळे झाकाळल्याने अजूनच काळीमा (पुन्हा अशुभ !) पसरलेला आहे.

झाकाळुनी जळ गोड काळिमा
पसरी लाटांवर
पाय टाकूनी जळात बसला
असला औदुंबर

“औदुंबर” हा वृक्ष वैराग्याचं प्रतीक आहे. संन्यासी वृत्ती ही औदुंबराशी जास्त निगडित आहे. त्यामुळे ह्या काव्याचा शेवट एकूणच संभ्रमावस्थेत आणून बालकवींनी संपविला आहे. औदुंबराच्या जळात पसरलेल्या मुळांना कवीने पसरलेल्या पायांची उपमा दिली आहे. हे जे काय अशुभ घडतंय ते एखाद्या वृद्ध योग्याप्रमाणे जळात आपले पाय पसरून औदुंबर स्थितप्रज्ञपणे पहात आहे.

पांढरा रंग हा वैधव्याशी निगडित आहे. हिरव्या म्हणजेच समृद्ध जीवनातून निघालेली पांढरी पायवाट हे प्रतिक बालकवींनी समाजातील परित्यक्ता स्त्रिसाठी वापरले आहे. सगळे आधार सुटल्यावर जीवनाच्या एका विवक्षित क्षणी ती कंटाळते आणि मृत्यूच्या काळ्याशार डोहात आपले जीवन समर्पित करण्यासाठी जाते. तिने काळ्या डोहाला जवळ करणे बालकवींनी अचूकपणे सुचित केले आहे. ह्या सर्वांचा साक्षी तो प्रती परमेश्वर “औदुंबर” स्थितप्रज्ञ राहून मुकाटपणे पाहतो आहे !

बालकवी आणि निसर्ग हे अद्वैत आहेत. त्यांचे प्रत्येक काव्य ह्याचं प्रमाण आहे. येथे केवळ आठ ओळींत बालकवींनी तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब यथार्थपणे उमटविले आहे. एक उदास छटा ह्या काव्यावर उमटविण्यात बालकवी यशस्वी झाले आहेत.

 

 

 

 

– आनंद बिरजे

Pros

  • +MARATHI POEM

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!