My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAPostbox Marathi

Love Jihad – लव जिहाद !

1 Mins read
  • Love Jihad - लव जिहाद

लव जिहाद !
अक्कल बरबाद !!

लेखक : ज्ञानेश महाराव

इस्लामींचा ‘जिहाद’ हे हिंदूंसाठी ‘धर्मयुद्ध’ आणि ख्रिश्चनांसाठी ‘क्रूसेड’ होतं. खरंतर ह्या तीनही शब्दांचे अर्थ वेगवेगळे हे आहेत. परंतु, धर्मवाद त्यांना ‘एकाच माळेचे मणी’ करतो. ‘सुईच्या टोकाइतकीही भूमी देणार नाही’, ह्या दुर्योधन- दु:शासनाच्या फूत्कारामुळे भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने झालेलं कौरव- पांडव यांचं युद्ध हे हिंदूसाठी ‘धर्मयुद्ध’ झालं आहे. ते कुठल्या धर्म-संप्रदायाच्या विरोधात नव्हतं. तर सत्य आणि न्यायासाठी लढलं गेलं. अर्थात, ती लढाई पुस्तकी आहे. ते राम-रावणाच्या युद्धासारखेच काल्पनिक आहे. तो मानवी जीवनाचा इतिहास नाही. याउलट, ‘क्रुसेड’ हे ख्रिस्त्यांची ओळख असलेल्या
‘क्रूस’च्या- ख्रिश्चन धर्माच्या रक्षणासाठी लढलेले युद्ध आहे. ते इ.स.१०९५ ते १२९१ दरम्यान जेरुसलेम येथील येशू ख्रिस्ताच्या पवित्र स्मृतीभूमीवर ताबा प्राप्त करण्यासाठी सात वेळा झालं. ते इस्लामींच्या विरोधात झालं. या भूमीवर पूर्ण हक्क प्रस्थापित करण्यासाठी ख्रिस्ती, यहुदी आणि मुसलमान यांच्यात आजही युद्ध सुरू आहे. ह्या युद्धाला मुसलमान ‘जिहाद’ म्हणतात.
‘जिहाद’ वा ‘जेहाद’ हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ ‘संघर्ष’ असा होतो. ‘जिहाद’चे दोन प्रकार आहेत. पहिला ‘जिहाद अल-अकबर’ म्हणजे ‘बड़ा जिहाद’! तो संघर्ष स्वत:मधील गैर-वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी करायचा असतो. दुसरा, ‘जिहाद अल असगर’ म्हणजे ‘छोटा जिहाद’! तो संघर्ष समाजातल्या अनिष्ट, अन्यायकारक गोष्टींविरोधात करायचा असतो. ह्या दोन्ही ‘जिहादचा उल्लेख ‘कुरान’ मध्ये आहे. कारण तो प्रेषित मोहम्मद यांनी आपल्या हयातीत इस्लामींकडून अपेक्षिला होता.
तथापि, ११ व्या शतकात जेरूसलेमच्या भूमीवरून वाद सुरू होऊन क्रूसेडर्सनी आक्रमणाची मोर्चे बांधणी केली. तेव्हा ‘जिहाद’ची बांग देत, मुस्लिमांना संघटित करण्यात आले. मुस्लिमांनी एकजुटीने ख्रिस्ती- क्रूसेडर्सचा पराभव करून त्यांना सिरियातून हटवलं आणि तिथे ‘इस्लामिक गणराज्य’ स्थापन केलं. म्हणजे, काल्पनिक धर्मयुद्ध असो वा ‘क्रूसेड – जिहाद’ असो; त्याचा संबंध भूमीच्या ताब्याशी आहे; तिथल्या सत्तेशी आहे; धर्मरक्षण वा धर्मविस्ताराशी नाही. त्यासाठी ख्रिस्ती क्रूसेडर्स आणि मुस्लीम जिहादी यांच्यात धर्मयुद्ध झाले; होत राहिले.
याउलट हिंदूंची ‘सब भूमी गोपाल की’, ‘विश्वचि माझे घर’ अशी विश्वव्यापी विचारधारा असल्याने हिंदभूमीवर पाच इस्लामी शाह्यांनी ६५० वर्षे राज्य केले आणि १५० वर्षे ब्रिटिशांनी अखंड भारत आपल्या राजवटीखाली ठेवला; तरी धर्मयुद्ध झाले नाही. तो अनुशेष हिंदूंमधील जातिभेदांच्या संघर्षाने भरून निघाला असावा.
असो. ७५ वर्षांपूर्वी भारत परकीय चक्रातून मुक्त होऊन सार्वभौम राष्ट्र झाला. तो होताना हिंदुस्तान-पाकिस्तान अशी नाही, तर भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली. पाकिस्तान इस्लामी धर्मराष्ट्र झाला आणि भारत सर्वधर्मांना सामावून घेणारे ’राष्ट्र’ झाला. सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागला. प्रगतिशील राष्ट्र अशी भारताची ओळख निर्माण झाली व ती उत्तरोत्तर वाढत राहिलीय. याउलट, हालत ‘धर्मराष्ट्र’ बनलेल्या पाकिस्तानची झालीय. धर्मराष्ट्राची सडकी आवृती इतकी खेटून असताना सत्तेसाठी देशात धार्मिक-जातीय तेढ-द्वेष वाढणार्‍या भाषेला-खेळ्यांना मोकळीक देणं, हिंदूराष्ट्राच्या फुसकुल्या सोडणं, हा ‘राष्ट्रद्रोह’ आहे. तोच आज देशात ‘राष्ट्रवाद’ म्हणून मिरवतोय. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे, वसईच्या ’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहाणाऱ्या श्रद्धा वालकर हिची आफताब पूनावाला ह्याने केलेली निर्घृण हत्या!
आफताबचे हे कृत्य अमानुष आहे; त्याला त्याबद्दल कठोर शिक्षाही होईल. ती झालीच पाहिजे. पण त्याने काय होणार ? अमानुषता- क्रौर्य कमी होणार, संपणार का ? त्याची चर्चा कोण करणार? २०१० मध्ये डेहराडून येथील राजेश गुलाटी याने पत्नी- अनुपमाची हत्या केली आणि रेफ्रिजेटर खरेदी करून त्यात मृतदेह ठेवला. त्यानंतर मृतदेहाचे ७० तुकडे करून त्याची एकेक करीत विल्हेवाट लावली. तेच १२ वर्षांनी आफताब पूनावाला ह्याने केले. त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून त्यातील रोज एकेक तुकड्याची विल्हेवाट लावली. बारा वर्षात ७० चे १४० तुकडे न होता; ३५ झाले; म्हणजे कौर्य निम्म्यावर आले, असे समजायचे का ? तुकडे कमी केले, म्हणून त्याचा धर्म तपासायचा, असे काही आहे का ?

आवरण : धर्मवादाचं मिश्रण

स्वजाती-धर्मासाठी हवी तेवढी माती खायची आणि परजाती-धर्माचे प्रकरण निघाले की, लोकांची माथी कशी भडकतील ते पाहायचे! असे उद्योग गेले ३०-३५ वर्षे देशात जाणीवपूर्वक सुरू आहेत. त्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्यासारखे साहित्यिक हेदेखील धर्मवादी राजकारण्यांना, लोकांना धर्मांध करण्यास उपयुक्त ठरेल, अशी ‘आवरण’सारखी कादंबरी लिहितात.
२००७ मध्ये प्रकाशित झालेल्या ह्या कादंबरीच्या कन्नड बरोबरच मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, इंग्रजी, मल्याळी अशा अनुवादित भाषेत चार वर्षांत ३४ आवृत्या प्रकाशित झाल्या. हा ‘कादंबरी’ विश्वातला विक्रम समजला जातो. तथापि, ह्या कादंबरीत असा काय पराक्रम आहे? तर कर्नाटकातील शेत‌कऱ्याची मुलगी लक्ष्मी ही शिकते. ‘फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये शिकण्यासाठी पुण्याला जाते. तिथे तिचं चित्रपट निर्माता आमीर कुरेशी याच्याशी प्रेम जुळतं. वडिलांच्या विरोधाला न जुमानता ती आमीरशी लग्न करते. ‘लक्ष्मी’ची ‘रझिया’ होते. आमीर कम्युनिस्ट असतो. त्याच्या विचारधारेच्या विद्यापीठातून रझिया कुरेशी वक्ता, विचारवंत, स्तंभलेखिका म्हणून नाव कमावते.
आमीर-रझियाला ‘हम्पी’ या वारसास्थळाच्या अवशेषावर माहितीपट बनवण्याचे काम मिळते. तिथे रझिया माहिती घेण्यासाठी गेली असता, हम्पीचा नाश वैष्णव- शिव संघर्षामुळे झाला, हे लेखन खोटे असल्याचे तिच्या लक्षात येते. विधवांनी कोरलेली नरसिंह देवाची भव्य मूर्ती पाहून तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. ‘रझिया’त पुन्हा ‘लक्ष्मी’ प्रगटते. शेवटी ‘सत्याच्या चष्म्यातून’ इतिहासाकडे पाहाण्याचा निश्चय करून ती पटकथा लिहिण्याचे नाकारते. आमीरला ते अनपेक्षित असतं. त्यातून दोघांत वाद होतात; ते मनातून दुरावतात. कोणताही धर्म न मानणारा अमीर इस्लामच्या तरतुदीप्रमाणे दुसरा ‘निकाह’ करतो. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूची बातमी आल्याने ‘लक्ष्मी’ गावाला जाते. मुक्कामात ती वडिलांनी संग्रहित केलेली पुस्तक- नोंदी तपासते. त्यात तिला बेगडी धर्मनिरपेक्षतेला- सर्वधर्मसमभावाला खतपाणी घालण्यासाठी पुरोगामी विचारवंतांनी रचलेल्या खोट्या इतिहासाचे दर्शन घडतं.
या साहित्यातून लक्ष्मी कादंबरी लिहू लागते. त्यातील राजपूत युवराज मृत्यूच्या भीतीने धर्मांतर करून औरंगजेबच्या जनानखान्याचा मौलवी बनतो. पुढे तो काशी विश्वनाथ मंदिराच्या मशिदीत झालेल्या बदलाचा ‘पाक मुस्लीम’ म्हणून साक्षीदार होतो. अशाप्रकारे भैरप्पा लक्ष्मीचा अभ्यास, चिंतन, जीवन आणि सार्वजनिक जीवन यांची सांगड घालून; तिला बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक असताना मुस्लीम बनलेल्या राजपूतच्या कथेशी जोडतात. वाचकात, विशेषतः तरुण वाचकात मुस्लीम द्वेष निर्माण होईल; पण तसा ठप्पा लागणार नाही, अशा सफाईने भैरप्पा यांनी ‘आवरण’ची मांडणी केलीय. त्यातून मुस्लीम राजांनी हिंदूंचे धर्मांतर करून, मंदिरे उद्ध्वस्त करून आपली जरब कशी निर्माण केली? तरीही, देव- देवळांच्या माध्यमातून हिंदू संस्कृती कशी टिकून राहिली, ते ठसवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. त्यात तथ्य आहेच. ते नसते तर सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, आंगणेवाडीची यात्रा औरंगजेबनीच सुरू केली, असा इतिहास वाचायला मिळाला असता! संतोषी माता, वैभव लक्ष्मी ही भाकड व्रतंही बादशहाची चौथी-पाचवी बेगम एकत्रपणे करीत होत्या, अशा थापाही शिवशाहिरांनी मारल्या असत्या. तसे झाले नाही.
तथापि, कादंबरीसाठी तथ्य पुरेसं ठरत असलं, तरी त्यातून सत्य प्रकाशत नाही. इतिहास हा तथ्यावर नाही, तर सत्यावर आधारित असतो. जेव्हा सत्य नसते, तेव्हा थेट इतिहास लेखन करण्याऐवजी कथा- कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा नटव्या- फसव्या माध्यमांचा आधार घ्यावा लागतो. ज्यांना हा फरक कळत नाही, ते नटव्या- फसव्या लेखनाला इतिहास समजतात. त्याने जसे ब.मो.पुरंदरेंचे फावले; तसेच डॉ. भैरप्पांचेही फावले. पण त्यातून जे साधायचे, ते साधले. ‘भाजप-संघ परिवार’चा निवडणुका जिंकण्याचा कार्यक्रम ’सेट’ झाला.

समाज विभाजक सनातनी कीडा

‘लव जिहाद’ हा शब्द चर्चेत वा प्रसिद्धीच्या झोतात नव्हता, तेव्हा १५ वर्षांपूर्वी ‘आवरण’ आणि त्यासारखे लेखन प्रकाशित होऊ लागले. त्यातून पुढे चित्रपटही आले. त्यात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने कमाल केली. हा चित्रपट लेखक- दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या नाटकावर बेतला होता. नाटकात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या दोन घराण्यांचा झगडा होता. मात्र त्याचा चित्रपट करताना पात्रांच्या विचार- वृत्तीत कमालीचे छेद-भेद निर्माण करण्यात आले. नाटकात ‘सदाशिव मला बहीण मानतो,’ अशी सांगणारी ‘झरिना’ चित्रपटात ‘उमा’ बनून ‘सदाशिव’ची प्रेयसी झालीय.
नाटकातला ‘उस्ताद’ वसंतराव देशपांडे यांनी गाजवला होता. ही व्यक्तिरेखा मुस्लीम असूनही त्यांच्या अभिनयाचा थाट ’हिंदुस्थानी’ असायचा. चित्रपटात ‘उस्ताद’ सचिन पिळगावकरने ‘ओवेसी’ थाटात केलाय. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना पंडित भानुशंकर आणि उस्ताद यांच्यातल्या ‘राजगायक’ पदासाठीच्या संगीतमय झगड्यातून हिंदू-मुस्लीम तेढ जाणीवपूर्वक दाखवणे- वाढवणे सोपं गेलं. ह्याला ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणतात. त्याआडून साहित्यातून, कलेतून, भडकावू बोलण्यातून मुस्लीम द्वेष कसा रुजवला, वाढवला जातो याचा अनुभव भारतवासी गेली ३०-३५ वर्षे घेत आहेत.
ह्या हेराफेरीलाही इतिहास आहे. अशा ‘सिनेमॅटिक’ चतुराईने संत तुकाराम यांचं ‘वैकुंठगमन’ सुशिक्षित आध्यात्मिकाच्या माथ्यात भिनवलंय. भालजी पेंढारकरांनी ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटातून आणि त्याच्या खूप आधी राम गणेश गडकरी यांनी ‘राजसंन्यास’ नाटकातून छत्रपती संभाजीराजांना बदफैली दाखवून करून ठेवलंय.
इतिहास आणि लेखन कला यांची सांगड घालून काळाला पुरून उरणार्‍या व्यक्तिमत्त्वांची बदनामी करणारा, समाजात जाती-धर्म-पंथ भेद-द्वेष निर्माण करणारा हा ‘सनातनी कीडा’ आता ‘लव जिहाद’च्या नावाने सामाजिक पोखरण आणि निवडणुकांत मतांचे विभाजीकरण-ध्रुवीकरण करीत आहे. यातूनच ‘भाजप’ची सत्ता असलेल्या ११ राज्यांत ‘धर्मांतर विरोधी’ कायद्याचा अंमल सुरू झालाय. महाराष्ट्रात तो नाही. परंतु ‘श्रद्धा- आफताब’ प्रकरणाच्या निमित्ताने ‘लव जिहाद’च्या नावाने ओरडा करीत ‘धर्मांतर विरोधी कायदा’ आणण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे काम सुरू झालंय.
‘श्रद्धा-आफताब’ प्रकरणात ’लिव इन’मध्ये राहाणारी श्रद्धा लग्नाचा आग्रह करीत होती, हे चौकशीत पुढे आलं; पण त्यासाठी आफताबने तिच्याकडे धर्मांतराची अट ठेवली होती का, ते अजून स्पष्ट झालेले नाही. वास्तवातून हवा तसा इतिहास रंगवता येतो; परंतु, वर्तमानातल्या प्रत्येक घटनेला इतिहासाशी जोडता येत नाही. प्रेमात, संसारात, कुटुंब-परिवारात ताणेबाणे असतात; त्यातून एकमेकांबद्दल गैरसमजही निर्माण होतात. ते व्यक्तीगणिक बदलतात. ते इतरांना सोडवता येत असतील, तर सोडवावेत. परंतु, त्याकडे जाती-धर्म-पंथ-प्रांत आणि अलीकडच्या ‘परमपूज्य’ यांच्या चष्म्यातून पाहू नये.
कारण धर्म- जात- पंथ- प्रांत कोणताही असो; आपल्या देशात कोणत्याही घटना- व्यवहारातील सत्य- असत्यता, योग्य- अयोग्यता ही कायद्याच्या कसोटीवर तपासली जाते. ती धर्म वा जात संस्थेच्या निकषांवर- नीतिनियमांवर जोखली जात नाही! हे स्पष्ट असतानाही श्रद्धाच्या हत्येला ‘लव जिहाद’चा शिक्का मारला जात असेल; तर तो मारणाऱ्यांना समाजात द्वेष पसरवायचा आहे, असा आरोप होणारच!

धर्माचं कारण, अधर्माचं रण

अर्थात, धर्मांतराच्या अटीवर ‘लव्ह मॅरेज’प्रमाणे तर ‘अरेंज मॅरेज’ही होतात. हा दाब- दबाव सर्वधर्मीयांकडून होतो. ‘डेटिंग ॲप’वरून तरुण-तरुणींचे प्रेम-लग्ने जुळतात. चिनी, जपानी, अमेरिकन, रशियन, निग्रो मुलींची लग्न अगदी गाव-पाड्यात हिंदू पद्धतीने होतात. त्यात राजीखुशी असते. शाहरुख खान व गौरी खान यांच्या प्रेमात- संसारात प्रगल्भता असते. असे कित्येक आंतरदेशीय-धर्मीय-जातीय प्रेम-संसार होतात. ते टिकून राहाण्यात महत्त्वाचा सांधा कोणता आहे, ते समजून घ्यायचे नाही. परंतु, अशा प्रेमात-संसारात काही वितुष्टता निर्माण झाली ; हत्या झाली की, जातीय-धार्मिक अशी बोंब मारायची; विशेषकरून, त्या जोडीत पुरुष मुस्लीम आणि स्त्री हिंदू असली तर ‘लव जिहाद’चा शिक्का मारायचा, हा वैचारिक लांडेपणा झाला.
अशा हत्या हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, शीख दांपत्यातही होतात. अशावेळी आपण त्यातलं क्रौर्य लक्षात घेऊन व्यक्त होतो. तसे आंतरजातीय-धर्मीय प्रकरणात का होऊ शकत नाही? हा अधर्म नाही का? ह्याचा विचार ‘लव जिहाद’चं खूळ भेज्यात खेळवणाऱ्या भक्ताडांनी करणे आवश्यक आहे. ‘लव जिहाद’ हा शब्द हिंदुत्ववाद्यांनी जन्माला घातलेला नाही. तो ज्यांच्या विरोधात मुस्लिमांनी पहिला ’जिहाद’ पुकारला, त्यांनी म्हणजे केरळच्या ख्रिस्ती धर्मगुरूने वापरात आणला.
२०२० मध्ये केरळमधील ‘कॅथलिक चर्च’ने मुस्लीम ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर करतात, असा आरोप करून ‘लव जिहाद’ हा आमचा शब्द असल्याचे दाखवून दिलेय. ‘लव जिहाद’बाबत देशाच्या धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) वा पुरोगामी विचाराला दोषी धरलं जातं. ते साफ चुकीचे आहे. बलात्काराचा मुद्दा आला की, ‘जात-धर्म पाहून कुणी बलात्कार करीत नाही,’ असा सामोपचाराचा युक्तिवाद केला जातो. तोच समंजसपणा ‘आंतरजातीय-धर्मीय’ प्रेम-विवाह प्रकरणात का दाखवला जात नाही?
मुस्लीम तरुण आणि हिंदू तरुणी यांच्या विवाहाला धर्मांतराच्या अटीवर मुस्लीम समाज लगेच मान्यता देतो. ही अट चुकिची आहे. परंतु, मुस्लीम मुलीला धर्मांतर न करता हिंदू मुलाशी लग्न करायचे असेल, तर ते हिंदू कुटुंब मान्य करते का ? या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक मुस्लीम व हिंदू तरुण-तरुणी धर्मांतर न करता; एकमेकांच्या धर्माचा आदर करीत; रीतिरिवाजांच्या पालनाला पूर्ण मोकळीक देत, संसाराचा-सहजीवनाचा आनंद घेत असल्याचे दिसतील. त्यांची संख्या कमी असेल; परंतु ती ‘लव जिहाद’च्या प्रकरणांपेक्षा नक्कीच जास्त आहे.
पुराणकथात कुणाला तरी समुद्रात बुडवल्याची गोष्ट वारंवार येते. विष्णू पुराणात समुद्रमंथनही आहे. तो सत्ययुगातला साक्षात्कार आहे. आजच्या कलियुगात ‘सोशल मीडिया’च्या समुद्रात लोकांना बुडवण्याचे प्रकार रोजच्या रोज नव्यानं घडत असतात. त्यातून विष आणि अमृत दोन्हीही बाहेर पडत असते. दोन्हीतला फरक समजण्याएवढी तरी अक्कल प्रत्येकाकडे असलीच पाहिजे!

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: