My page - topic 1, topic 2, topic 3

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox MarathiSANSKRITISANSKRITI DHARA

Indira Sant – कवयित्री इंदिरा संत आणि गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर

1 Mins read

Indira Sant – कवयित्री इंदिरा संत

 

Indira Sant – ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त

13/7/2021

सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…

(ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी जागवलेल्या स्मृती…)

२६ जानेवारी २००१ ला ‘पद्मश्री’ मिळाल्याची बातमी आली आणि सर्वात प्रथम आठवण आली ती आदरणीय इंदिराबाई आणि कुसुमाग्रज यांची ! वास्तविक पाहता माझं आणि Indira Sant इंदिराबाईंचं नातं काय? या नात्यानं मला काय दिलं? गर्भरेशमी कवितेचा ध्यास, गर्भरेशमी कवितेचा नाद… त्यांनी मला जो कवितेचा ‘राजमार्ग’ दाखवला त्या वाटेवर बकुळ, प्राजक्त आणि सोनचाफ्याचा सडाच अंथरला होता. या वाटेवरून जाताना सुगंधच सुगंध होता. मला त्यांच्या कवितांनी अक्षरश: वेढून टाकलं, मोहून टाकलं आणि त्यांच्याच कवितेच्या ओळी आठवल्या….
‘केव्हा कसा येतो वारा,
जातो अंगाला वेढून
अंग उरते न अंग,
जाते अत्तर होऊन…’
असं अंग अत्तर अत्तर होऊन गेल्यावर, आणखीन जीवनात आनंद तो अजून कुठला?
इंदिराबाई आज आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच नाही. त्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, अगदी कुठलीही लहानसहान गोष्ट करताना त्या, सतत सखीसारख्या माझ्या सोबतच असतात. त्यांची कविता गाताना तर त्यांचं ‘चैतन्य’ माझ्या रक्तारक्तातून वाहत असतं.
‘होऊन माझ्यातून निराळी,
मीच घेतसे रूप निराळे.
तुझ्या संगती सदा राहते,
अनुभविते ते सुखचि आगळे
तुझ्यासवे मी विहरत फिरते,
चंचल संध्यारंगामधुनी
तुझ्यासवे अंगावर घेते,
नक्षत्रांचे गुलाबपाणी!’…
या नक्षत्रांच्या गुलाबपाण्यात माझे सूर चिंब भिजून जातात आणि,
“होकर मुझही से निराली, लेती हूँ मै रूप निराला
तेरे संग सदा रहती हूँ,
अनुभव करती सुख अलबेला”

या संपूर्ण कवितेचा भावानुवाद मला हिंदीत सहज सुचतो नि ‘माझी न मी राहिले’ अशी अवस्था होऊन जाते.

१३ जुलैला Indira Sant इंदिराबाईंच्या निधनाची वार्ता ऐकली आणि,
‘एक तुझी आठवण,
वीज येते सळाळून
आणि माझी मनवेल,
कोसळते थरारून…’
अशी माझ्या मनाची अवस्था झाली आणि गेल्या ५-६ वर्षांचा काळ डोळ्यांसमोर सरसर उलगडत गेला. ६ वर्षांपूर्वी इंदिराबाईंना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ दिला गेला. त्या समारंभाची सांगता मी त्यांच्याच ‘रक्तामध्ये ओढ मातीची’ आणि ‘कधी कुठे न भेटणार’ अशा दोन कवितांनी केली होती. कार्यक्रम संपल्या संपल्या आदरणीय तात्यासाहेबांच्या (कुसुमाग्रजांच्या) आज्ञेवरून ‘रंगबावरा श्रावण’ व ‘घर नाचले नाचले’ (निवड कुसुमाग्रजांची भाग १ व २) अशा Indira Sant इंदिराबाई, कुसुमाग्रज व शंकर रामाणींच्या कवितांच्या कॅसेट्सची हळूहळू तयारी सुरू झाली. त्यानिमित्तानं कवितांचं वाचन सुरू झालं. जर एखाद्या बाईला खानदानी, भरजरी साड्या एकानंतर एक उलगडून दाखवल्या तर ‘ही निवडू का ती निवडू…’ अशी तिची स्थिती होईल, अशीच या कवितांच्या बाबतीत माझीही स्थिती झाली. इंदिराबाईंच्या शब्दात सांगायचं म्हणजे, …
‘कुणी ठेविले भरून, शब्दाशब्दांचे रांजण
छंद लागला बाळाला, घेतो एकेक त्यातून…’
अशा त्याच्या शब्दासाठी, माझी उघडी ओंजळ
शब्द शब्द साठविते, जसे मेघांना आभाळ…
असंच झालं.

२३ ऑगस्ट १९९७ रोजी तात्यासाहेबांच्या सूचनेवरून इंदिराबाईंच्याच गावी, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याकरीता बेळगावला प्रकाशन सोहळा करायचे ठरवले. त्या दिवशी दुपारी दूरदर्शन, चॅनलवाली मंडळी इंदिराबाईंची प्रतिक्रिया विचारत होती. इतकं थोर व्यक्तिमत्त्व, पण हातचं न राखता इंदिराबाई अगदी सहजपणे म्हणाल्या, “आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे! माझ्या कविता आज पद्मजाच्या गळ्यातून फोटो काढल्यासारख्या चित्रमय होऊन, जिवंत होऊन रसिकांसमोर येत आहेत. माझी कविता फक्त पद्मजाच गाऊ शकते. तीच फक्त तिचं कवितापण जपू शकते!” प्रत्यक्ष साहित्यसम्राज्ञी, काव्यसम्राज्ञी, मायमराठी माऊलीने दिलेला फार मोठा आशीर्वाद होता तो माझ्यासाठी!

अक्कांच्या प्रेमाखातर अत्यंत उत्साहाने, या सोहळ्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे ‘तरुण भारत’ बेळगांवचे संपादक श्री. किरण ठाकूर, साहित्यिक व न्यायमूर्ती डॉ. नरेंद्र चपळगांवकर, देशदूतचे संपादक श्री. शशिकांत टेंबे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक अशोक जैन, प्रख्यात लेखिका डॉ. श्रीमती अरुणा ढेरे तसेच बेळगांवचेच थोर कविवर्य शंकर रामाणी वगैरे सारी मंडळी अगत्याने आली होती. तुफानी पावसातही सभागृह श्रोत्यांनी ओसंडले होते. या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक नाशिकच्या भालचंद्र दातार आणि परिवाराने नेटाने झटून हा सोहळा एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही नेत्रसुखद आणि संपन्न करायचा घाट घातला होता. प्रत्येकाला वाटलेल्या सोनचाफ्यांच्या फुलांचा ‘मंद सोनेरी सुगंध’ हॉलभर दरवळत होता. सोनचाफी रंगाची साडी परिधान केलेल्या इंदिराबाईंचे, फुलांनी सजवलेल्या एका कमानीखालून स्टेजवर आगमन होत असताना त्यांचीच कविता
‘दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले
आज येणार अंगणी, सोनचाफ्याची पाऊले..’
असं मी म्हणत असताना, Indira Sant इंदिराबाईंवर पुष्पवृष्टी झाली आणि त्यावेळी छप्पर फाडून टाकणाऱ्या टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत झालं. कविवर्य ग्रेस यांनी या प्रसंगाचं वर्णन म्हणजे, “जगात कुठल्याही कवीचा याहून मोठा आणि योग्य सत्कार तो काय असू शकतो? मीरेची एकट, एकाकी विरह वेदना, मराठीत अस्सल आत्मतत्त्वाच्या करांगुलीवर जर कुणी तोलून धरली असेल तर ती या इंदिराबाईंनीच! त्या कविता तुम्ही गायलात पद्मजाबाई, त्या ऐकताना खरंच सांगू का तुम्हाला! मीराच ज्यावेळी आपल्या सखीच्या कानात गुणगुणत सांगते आपल्या वेदनेचे स्वरूप…
दुखियारी प्रेमरी, दुखडा रोमूल
हिलमिल बात बनावत मोसो
हिवडवामे (हृदयात) लगता है सूल… इंदिराबाईंच्या वेदनेचा हा काटा तुमच्या गळ्याला गायिका म्हणून नक्कीच झोंबला असणार….!”

इंदिराबाईंच्या ‘रंग बावरा श्रावण’ कॅसेट प्रकाशन सोहळ्यासाठी मुंबईहून निघताना इंदिराबाईंच्या सख्ख्या मैत्रिणीने, आदरणीय दुर्गाबाई भागवतांनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या.

“लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा, हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले, तरी मनाने त्यात आहे बरं का!”
तुझी दुर्गाबाई.

इंदिराबाईंना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न मिळाल्याची खंत मात्र या प्रिय मैत्रिणीच्या पत्रात जाणवते. तसंच इंदिराबाईंनाही दुर्गाबाई म्हणजे त्यांच्या साहित्याचा आधार वाटतात. दोघीही मनस्वी, प्रखर स्वाभिमानी आणि विदुषी असल्या तरी दोघींचं एकमेकींवर जबरदस्त प्रेम! एकमेकींविषयी आदर आणि ओढ पाहून मला अनेकदा डॉ. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई आठवतात. अशा या इंदिराबाई आणि दुर्गाबाईंच्या पत्रांचे ‘पोस्टमन’ होण्याचे भाग्य मला लाभले!

इंदिराबाई म्हणतात, “सर्वसामान्य लोकांच्या भावनांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य ज्याप्रमाणे माझ्या कवितेत नाही, त्याप्रमाणे ते माझ्या वाचनातही नाही. माझ्या कवितेची लोकप्रियता ही विशिष्ट लोकांपुरतीच आहे.” हे वाचून ‘जो संग तुझपे गिरे, और जख्म आये मुझे’ अशी माझी अवस्था झाली. आता तर माझा सर्वतोपरी हट्ट असतो की, प्रत्येक कार्यक्रमातून इंदिराबाईंच्या काव्यरत्नांचे हार पेटीत केवळ जपून न ठेवता, जास्तीत जास्त (अ)सामान्य रसिकांसमोर उलगडून दाखवावेत. हा माझा खारीचा प्रयत्न जरी असला तरी तो (सर्व)सामान्यांचेही हृदय पाझरवणारा आहे, हे मी प्रत्यक्ष मैफिलीत अनेकदा अनुभवले आहे.
कुणी निंदावे त्याला, करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा, त्याचा करावा मी सत्कार!
असे साधेसुधे सूत्र घेऊन जगणाऱ्या इंदिराबाईंच्या कविता म्हणजे तरलता, निसर्गरम्यता आणि भावनांनी ओथंबलेल्या तरल कवितांचा मोरपिशी स्पर्श! भावनांचे हळवे प्रकटीकरण म्हणजे इंदिराबाईंची लेखणी!

इंदिराबाईंची कुठलीही कविता वाचताना चित्ररूप डोळ्यासमोर येते, ही तिची ताकद आहे. त्यांची ‘बाळ उतरे अंगणी’ म्हणताना तर दुडुदुडु धावणारं गोंडस बाळ डोळ्यासमोर येतं. अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील कुठल्याही अजीव वस्तूतसुद्धा अक्कांना चैतन्य दिसतं. त्यात बाळाच्या पायाला स्पर्श करणारी ‘मऊशार काळी मखमली माती’ आणि ‘चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण’ म्हणताना सजीव होऊन माती आणि अंगण बाळाभोवती प्रेमाची पखरण करतात असं जाणवतं.
‘किती दिवस मी मानीत होते,
ह्या दगडापरी व्हावे जीवन
पडो ऊन वा पाऊस त्यावर,
थिजलेले अवघे संवेदन
दगडालाही चुकले नाही,
चुकले नाही चढते त्यावर
शेवाळाचे जुलमी गोंदण,
चुकले नाही केविलवाणे
दगडफुलाचे त्यास प्रसाधन!’
दगडासारख्या निर्जीव गोष्टींमधेही सजीवपणा जाणवणारं किती संवेदनशील मन असेल अक्कांचं! गंमत म्हणजे ‘वंशकुसुम’ हा कवितासंग्रह तर पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय त्यांनी!
‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,
गुलबाशीच्या फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो..
काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यात
एवढेच बोलली ती, घागरीला हात देत…’

या कवितेत तमाम ‘स्त्री’जातीची कथाच (नव्हे व्यथाच) अवघ्या चार ओळीत वर्णिलेली आहे. ‘अल्पाक्षरी’ कवितेत इंदिराबाई वैश्विक सत्य अगदी सहजपणे सांगून जातात.
‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…
सूर्यकिरण म्हणाले, घालू दारात रांगोळी
शिंपू पायावरी दव, म्हणे वरून पागोळी…!’

अशा कविता म्हणजे अक्का आणि निसर्ग अशी नात्याची सुंदर गुंफण आहे. त्यांची प्रत्येक कविता, एखादं फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं तशी, किंवा एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. दवबिंदूला जसे स्पर्श करतानाच, तो फुटून जाईल की काय, या भीतीनं या कवितेतील कवितापण जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता ही त्या कवीचं ‘बाळच’ असते.
‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ
दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ!’
यातील ‘तुळस वेल्हाळ’ म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच किंवा सहीच जणू! अक्कांची
‘किती उशिरा ही ठेच, किती उशिरा ही जाण
आता आजपासूनिया माझे, आभाळाचे मन’
ही आत्मस्पर्शी, आत्मभान असलेली कविता वाचून तर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. प्रत्येकानं आभाळाचं मन ल्यायचं ठरवलं, तर या धर्तीवर केवळ आनंदच उरेल नाही?

इंदिराबाईंच्या शांत, सौम्य स्वभावाचा आणखी एक वेगळा पैलू त्यांच्या प्रारब्ध या कवितेत जाणवतो. प्रारब्धालाही ठणकावून सांगणाऱ्या व प्रसंगी मन कठोर करणाऱ्या अक्का म्हणतात,
‘प्रारब्धा रे तुझे माझे,
नाते अटीचे तटीचे
हारजीत तोलण्याचे,
पारध्याचे सावजाचे…
जिद्द माझीही अशीच,
नाही लवलेली मान,
जरी फाटला पदर,
तुझे झेलते मी दान…
काळोखते भोवताली
जीव येतो उन्मळून,
तरी ओठातून नाही,
_ तुला शरण शरण…!’_
ही कविता कठीण प्रसंगी ताठ मानेनं उभ राहण्याचं बळ देते. तसंच, पती ना.मा. संत गेल्यावर लिहिलेली,
‘कधी कुठे न भेटणार,
कधी काही बोलणार
कधी कधी न अक्षरात,
मन माझे ओवणार
व्रत कठोर हे असेच,
हे असेच चालणार…’

यात अक्कांचं, सात्विक, सोज्वळ, तेजस्वी, ओजस्वी आणि निश्चयी व्यक्तिमत्त्व दिसून येतं. “चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत.” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात.

‘मराठी काव्याला पडलेली एक सुंदर मोरस्पर्शी निळाई’ असं कवयित्री शांताबाई शेळके इंदिराबाईंबद्दल म्हणतात, तेव्हा मी अक्कांच्या निळाईत बुडून जाते आणि वाटतं…..
किती तुला आठवावे, किती तुला साठवावे,
जिवाभावा एक ध्यास, एकरूप व्हावे व्हावे!
सूर्याचे तेजःकण आणि चंद्राची शीतलता त्यांच्या लेखनात आहे. चंद्रसूर्याची साथ आपल्याला आयुष्याच्या अंतापर्यंत आहे, तशीच साथ मला इंदिराबाईंच्या तेज, रंग, रूप, गंध ल्यालेल्या कवितेची आहे. सोनचाफ्याच्या पावलांनी माझ्या घरी आलेल्या त्यांच्या कविता म्हणजे आनंदी पाखरंच आहेत! म्हणूनच इंदिराबाईंच्याच शब्दांत म्हणावसं वाटतं…..

गेली निघून हासत, घर भरले खुणांनी
सोनपाखरे टिपावी, किती वाकूनी वाकूनी…!

 

 

 

गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: