Also Visit for Trending News & Article  Postbox Live

SANSKRITISANSKRITI DHARA

Indian Social System – प्रतिक्रांती रोखायला हवी. – डॉ. आ. ह. साळुंखे

1 Mins read

Indian Social System भारतीय समाजव्यवस्थेमधला जो अंतर्गत संघर्ष आहे, त्या क्षेत्रातला एक धोका आणि अमेरिकन जीवनपद्धती सर्व जगावर एक प्रकारची हुकूमशाही लादायला लागली आहे हा दुसरा धोका.

जगातल्या वेगवेगळ्या, विशेषतः आशियातील, देशांकडे पाहताना माणसं म्हणजे फक्त गिऱ्हाइकं आहेत अशा प्रकारचा अमेरिकेचा दृष्टिकोण आहे. अमेरिका आपल्याला बाजारपेठ म्हणून वापरते हा जो यातला दुसरा धोका, त्याविषयी मी प्रथमतः मत मांडतो.

नव्या व्यवस्थेत विषमता वाढण्याचा धोका

अमेरिका आता नैतिक-अनैतिक याचा काहीही विचार न करता ज्याच्या मनगटात बळ असेल त्याच्या इच्छेप्रमाणे सारे काही चालेल, असे वागू लागली आहे. याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. दुबळ्या माणसांना जसे काही जगण्याची गरजच नाही! जो सामर्थ्यशाली असेल, तो जगेल.

म्हणजे सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट म्हणतात अशा प्रकारचे. पण हा जो प्रकार असतो, तो एका अर्थाने रानटी अवस्थेतील किंवा असंस्कृत Indian Social System समाजव्यवस्थेमधला असतो. रानटी अवस्थेमधे ज्याच्याकडं जास्त बळ असेल तो जगेल, दुबळा असेल तो नष्ट होईल.

पण समाज ज्या वेळी सुसंस्कृत होतो, त्या वेळी दुबळ्यांनादेखील संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना विकासाची संधी दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, हा विचार पुढे येतो आणि त्यांच्या ठिकाणी असलेल्या गुणवत्तांचा समाजाला खूप उपयोग होऊ शकतो. एका बाजूला दुबळे असले,

तरी दुसऱ्या बाजूनं ते प्रतिभाशालीही असू शकतात. आज आता अमेरिकन पद्धती जी येत आहे, तिच्यामधे काही लोकांना खूप पैसा मिळेल. यामुळे विषमता निर्माण होण्याचा धोका अधिक आहे. काहींना संगणक वापरण्यासाठी लाखांमध्ये, कोटींमध्ये पगार दिले जातील, तर काहींना पोट भरण्याइतकेही दिले जाणार नाहीत.

यातून तरुणवर्ग वैफल्यग्रस्त होऊ शकेल, मनोरुग्णता वाढेल किंवा गुन्हेगारी वाढेल आणि समाजामधे एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होईल. ज्यांच्याकडे जास्त पैसा येईल, तेदेखील सुरक्षित राहू शकणार नाहीत.

आजच आपण जर देशभरचं चित्र बघितलं, तर लुटालूट, वाटमाऱ्या असे जे प्रकार सुरू आहेत, ती संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, असं दिसतं. या पार्श्वभूमीवर येऊ घातलेली अमेरिकन जीवनपद्धती आपल्याला परवडणारी नाही.

या समाजातल्या प्रचंड लोकसंख्येला काही आधार नाही, जगण्याचा मार्ग नाही, अशी स्थिती झाल्यास अनैतिक मार्गाने जाण्याची इच्छा नसताना देखील अनेक लोक त्या मार्गाकडं ढकलले जातील. हिंसाचार कदाचित वाढू शकेल.

गरीब लोक चिरडले जाऊ शकतील आणि त्यामुळे Indian Social System समाजव्यवस्था निकोप राहण्याच्या दृष्टीनं मोठा अवघड प्रश्न आपल्यासमोर निर्माण झाला आहे. याचा गंभीरपणे विचार करावा लागेल.

किमान तीनदा प्रतिक्रांती झाली आहे.

दुसऱ्या बाजूनं भारतीय Indian Social System समाजव्यवस्थेमधे प्राचीन काळापासून वर्णव्यवस्थेमुळं निर्माण झालेली विषमता आहे. तीदेखील आता एक नवा चेहरा घेऊन आपल्या समाजामधे येत आहे. आपल्या देशात वारंवार असं झालं आहे, की क्रांतीनंतर प्रतिक्रांती असं चित्र पहायला मिळतं.

आपण सध्या प्रतिक्रांतीच्या निर्णायक वळणावर आहोत, असं मी अनेकदा म्हटलं आहे. गेली अनेक वर्ष एक समतेचं, न्यायाचं, सर्वांना सामावून घेण्याचं वातावरण निर्माण होत होतं. नवा विचार स्वीकारला जात होता.

पण परंपरा टिकवून ठेवू पाहणारे, आपलं वर्चस्व टिकवू पाहणारे जे लोक असतात, ते या नव्या प्रवाहाला रोखून धरून संपूर्ण व्यवस्थेला पुन्हा एक संकुचित असा आकार देण्यासाठी सतत झटत असतात. या देशामधे सिंधू संस्कृतीनंतर वैदिक प्रतिक्रांती झाली, असं आपल्याला दिसेल. या प्रतिक्रांतीमधे वेदप्रामाण्य आलं.

याचा अर्थ स्वतंत्र बुद्धीनं विचार करायचा नाही, पूर्वीच्या लोकांनी जे सांगून ठेवलं आहे तेच खरं. यामधे विकास थांबतो. कारण, नव्या विचाराला बंदी घातली आहे. चिकित्सा करण्याची परवानगी नाही.

वेदप्रामाण्याच्या आधारे विचारस्वातंत्र्य नष्ट केलं गेलं, यज्ञयागाच्या आधारे चाकोरीबद्ध कर्मकांडात माणसांना अडकवून ठेवलं गेलं आणि चातुर्वर्ण्याच्या आधारे माणसामाणसांत विभागणी केली गेली. त्यानंतर गौतम बुद्धांची क्रांती झाली.

त्यांनी या तिन्ही गोष्टींतून भारतीय मनाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. पण गौतम बुद्धांची एवढी मोठी क्रांती झाल्यानंतर आणि सम्राट अशोकाचं मोठं साम्राज्य होऊन गेल्यावर मनुस्मृती आली. या देशात बुद्ध अगोदर आणि मनुस्मृती नंतर, हे मी नेहमी सांगत आलो आहे.

बुद्धांच्या काळात एवढी उंची गाठल्यानंतर, समतेचं तत्त्व स्वीकारल्यानंतर, माणूस एवढा मुक्त झाल्यानंतर पुन्हा मनुस्मृती आली. मनुस्मृती हा केवळ एक ग्रंथ नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते एका व्यवस्थेचं प्रतीक आहे. ते एका व्यवस्थेचे कायदे आहेत.

ती व्यवस्था पुढील दोन हजार वर्ष भारतीय माणसाच्या मानगुटीवर बसली. यानंतर बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, कबीर, तुकाराम या संतांनी खूप मोठं काम केलं. सर्व जातींमधील व धर्मातील लोकांना बरोबर घेणारे छ. शिवाजी महाराज होऊन गेले.

त्यांनी खूप मोठं काम केलं. हा एक उदार, सर्वसमावेशक प्रवाह निर्माण झाल्यानंतरही समाजामधे पेशवाईनं वर्णव्यवस्थेच्या आधारानं पुन्हा प्रतिक्रांती केली. अशी तीन वेळा तरी ठळकपणे प्रतिक्रांती झाल्याचं दिसतं. तशी आता एक नवी प्रतिक्रांती आली आहे.

फुले-शाहू-आंबेडकरांनी एक नवा विचार दिला, लोकशाही आली, समतेचं वातावरण निर्माण झालं. नवी राज्यघटना आली. हे सगळं एका बाजूला होत असताना ही सगळी व्यवस्था उलटवून टाकणं, त्यासाठी एक धर्मसंसद उभी करणं, जुन्या धर्मग्रंथांच्या आधारेच पुढची वाटचाल करणं, असे प्रयत्न चालू आहेत.

ते पूर्णपणे यशस्वी झालेले नाहीत, पण लोकांच्या मनामधे त्यांचं आकर्षण निर्माण झालं आहे. हे प्रतिक्रांतीचे लोक एका रात्रीतून प्रतिक्रांती घडवतात असं नाही, तर त्यासाठी पन्नास वर्ष, शंभर वर्षं ते प्रयत्न करतात, दबा धरून प्रतिक्रांती घडवून आणतात. आजची स्थिती संक्रमणाची स्थिती आहे.

अजून कुणी पूर्ण पराभूत झालेलं आहे असं नाही. या काळामधे आपण सावध असायला हवं आणि Indian Social System प्रतिक्रांती रोखायला हवी.

अजून खूप काही व्हायला हवं.

नेहमीच असं घडतं, की क्रांती होते तेव्हा जेवढं अपेक्षित असतं तेवढं होत नाही. ती स्थिती आजही आहे. फुले-शाहू-आंबेडकरांनंतर आपण जेवढी झेप घ्यायला हवी होती, तेवढी घेतलेली नाही.

त्यामुळं एक प्रकारची अपूर्णता, अपेक्षाभंग आहे. पण, याचा अर्थ काही झालंच नाही, असं नाही. खूप बाबतींत आपण पुढचा टप्पा गाठला आहे. उदा. स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीमधे हे पाहता येईल.

अनेक स्त्रिया मुक्त झाल्या, पुरुषांच्या बरोबरीनं काम करू लागल्या, हे घडलं आहे. पण दुसऱ्या बाजूला स्त्रियांची निरक्षरता, आरोग्याचे प्रश्न इत्यादी क्षेत्रांत अजून खूप काही व्हायला हवं. जे झालेलं आहे त्याबद्दल समाधान वाटतं, पण जे झालेलं नाही त्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल.

विज्ञानाचा लाभ सर्व स्तरांतील लोकांना व्हावा.

प्रत्येक माणसाला उपजीविकेचं चांगलं साधन देणं, त्याच्या ज्या काम करण्याच्या सुप्त क्षमता आहेत – शारीरिक, बौद्धिक, हस्तकौशल्याच्या त्या ध्यानात घेऊन त्याला स्वाभिमानानं आपला उदरनिर्वाह करता येईल अशी व्यवस्था निर्माण करणं, विज्ञानाचा लाभ सर्व स्तरांतील लोकांना करून देणं, हे आवश्यक आहे.

याचा अर्थ संगणक वगैरेला विरोध करायचा, असं नाही. एका बाजूनं ते येणारच आहे. ज्या गोष्टी आपण रोखू शकणार नाही, त्यांना विरोध करणं चुकीचं ठरेल आणि नवं तंत्रज्ञान आलंच पाहिजे. पण येणाऱ्या तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा उपयोग समाजाच्या सर्व स्तरांमधे पोचला पाहिजे.

समाजातल्या काही मूठभरांच्या हातात विज्ञान जाऊन त्यांनी फार प्रबळ बनणं, त्यांनी गैरवाजवी प्रमाणात वाढणं आणि याचा परिणाम म्हणून इतरांनी फार हीन अवस्थेत राहणं, या पद्धतीनं विज्ञानाचा उपयोग होणं हे गैर आहे.

विज्ञानाचा उपयोग सामान्यातल्या सामान्य माणसाला श्रमदास्यातून मुक्त करण्यासाठी करावा लागेल. त्याला कला, क्रीडा यांचा आनंद घेता यायला हवा. अडचण ही आहे, की अजून प्राथमिक गरजाच भागल्या जात नाहीत, साक्षरतेचे प्रश्न आहेत.

असा माणूस श्रमदास्यातून मुक्त होऊन कला, क्रीडा यांचा आनंद घेईल, हा फार दूरचा पल्ला आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

शोषित लोकच प्रतिक्रांतीला बळ देतात.

Indian Social System धार्मिक अंगानं जी प्रतिक्रांती येते आहे, तीत एक आपल्याला असं दिसतं, की जे या प्रतिक्रांतीला बळी पडणारे असतात, तेच या प्रतिक्रांतीचं समर्थन करण्यासाठी उभे राहतात. या प्रतिक्रांतीचं हे एक मोठं बळ असतं.

याचं कारण जे प्रस्थापित लोक असतात, ते धर्माच्या नावाखाली काही डावपेच करत असतात, काही प्रचारयंत्रणा वापरत असतात. त्यातून होतं असं, की जे शोषणाला बळी पडणारे असतात, ते आपलं शोषण होत आहे असं मानतच नाहीत.

जे काही घडत असतं, त्यात त्यांचं खूप काही हिरावून घेतलं जात असतं, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचं सत्त्व काढून घेतलं जात असतं, व्यावहारिकदृष्ट्या त्यांची निर्णय घेण्याची शक्ती व धन हे अधिकार काढून घेतले जात असतात. पण तरी त्यांना असं वाटत असतं, की माझ्या धर्माचं रक्षण करणं हे माझ कर्तव्य आहे.

यासाठी ते स्वतःचा जीव द्यायला किंवा दुसऱ्याचा जीव घ्यायलाही तयार असतात. ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेतून या वर्गाला बाहेर काढणं, ही आपल्या चळवळीची खरी मोठी गरज आहे, असं मला वाटतं.

प्रतिक्रांती जेव्हा येत असते, तेव्हा प्रतिक्रांती करणाऱ्या लोकांचं एक बळ असतं. ते डावपेच करत असतात, त्यांचा स्वार्थ साधत असतात. हे आपण समजून घेऊ शकतो, की माणूस स्वतःच्या हिताचं आहे ते करेल. हे प्रस्थापितांचं आपण समजू शकतो.

काही पथ्यं पाळू या

Indian Social System दुसऱ्या बाजूला बळी पडणारे जे लोक आहेत, त्यांनी काही पथ्यं पाळणं हेही आवश्यक असतं. ती न पाळण्यानं प्रतिक्रांती यशस्वी होते. पहिलं पथ्य म्हणजे जे जे शोषणाला बळी पडतात आणि शोषणमुक्तीच्या लढाया करतात, त्यांनी ऐक्य साधणं हे फार महत्त्वाचं आहे.

त्यासाठी अर्थात व्यक्तिगत, छोट्या छोट्या संघटनांचे अहंकार बाजूला ठेवायला लागतील. हे होत नाही. आपण जर समतेच्या चळवळी करत असू, तर कार्यकर्त्यांना एक असं प्रशिक्षण आवश्यक आहे, की आपल्या समविचारी लोकांबरोबर संघर्ष करणं टाळलं पाहिजे.

एक माणूस म्हणून चांगलं कसं वागलं पाहिजे, याचं प्रशिक्षण आवश्यक आहे. मग त्यामधे पुन्हा धार्मिक पद्धतीनं बोलायचं झालं तर मत्सर, अहंकार हे विकार टाळले पाहिजेत. समतेच्या, माणूसकीच्या गोष्टी सांगताना त्या विकारांवर मात केली पाहिजे.

अनेकदा एखादा छोटासा कार्यकर्ताही पुरोगामीपणाचं सोवळं घेताना दिसतो. यातून प्रस्थापित लोकांचं बऱ्याचदा फावतं. एखादी मोठी इमारत उभी करताना नुसता आराखडा काढून चालत नाही, तर हातानं विटेवर वीट रचत पुढं जावं लागतं. मोठमोठी स्वप्नं, मोठमोठी भाषा, क्रांतीचे शब्द हे सगळं केलं जातं.

पण कणाकणानं कसं पुढं जाता येईल, याचे संस्कार चळवळीच्या लोकांवर अनेकदा होत नाहीत. हे संस्कार झाल्याशिवाय चळवळीत होणारी फाटाफूट थांबणार नाही. आपापली कामं करत राहावं. माणूस म्हणून जगताना असं असतं, की दोन्ही पातळ्यांवर तुम्हांला विधायक दृष्टिकोण ठेवावा लागतो.

म्हणजे एक मनुष्य म्हणून समाजानं व्यक्तीला चिरडून टाकू नये, व्यक्तीच्या आशाआकांक्षा पूर्णपणे आपल्या चाकोरीत बंद करून टाकू नयेत, हे एका बाजूला; तसं दुसऱ्या बाजूनं आपला व्यक्तिगत अहंकार समाजातील इतरांना मारक ठरेल, असं होऊ नये. त्यानं समाजातील इतरांशी सहकार्य केलं पाहिजे.

परस्परांना पूरक रहायचं म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्यही जपायचं आणि समाजाशी व्यक्तीची बांधीलकीही मानायची. छोट्या छोट्या संस्थांचं अस्तित्व तुम्ही जपा, वाढवा.

पण एका व्यापक अशा दूरच्या समतेच्या समाजासाठी, वैचारिक शत्रू आपली कोंडी करत असताना काही व्यापक मुद्द्यांवर तरी इतर चळवळींशी, इतर संस्थांशी तुम्ही निकोप संबंध ठेवले पाहिजेत.

त्या त्या जातीच्या अंतर्गत प्रबोधन होऊ द्या.

Indian Social System औद्योगिक क्रांतीतून संपूर्ण समता येते, असं मला वाटत नाही. काही फरक निश्चित होतो. जसे रेल्वेतून सगळे जाऊ लागले; पण तेवढ्यानं जातिव्यवस्था जाईल असं होत नाही. अमेरिकन जीवनपद्धतीनं जातिप्रथा संपेल असं होणार नाही. काही प्रमाणात बदल होतील.

आपल्याला जाणीवपूर्वक जातिव्यवस्थेच्या बाबतीमधे ती नष्ट करण्याचं स्वप्न नजरेपुढं ठेवलं पाहिजे. जातीच्या आधारे माणसामाणसांमधे भेद राहू नये, हे बरोबर आहे. पण आजचं वास्तव काय आहे, हेही पाहिलं पाहिजे.

माझं नेहमी असे म्हणणं असतं, की क्षितिजावर पण आपली नजर असावी आणि पायांखाली पण आपली नजर असावी. क्षितिजावर नजर असली तर आपली स्वप्नं कोणती, ध्येयं कोणती हे आपल्याला कळतं आणि पायांखाली नजर असली, की जमिनीवरचे खाचखळगे आपल्याला कळतात.

वास्तवाचं भान राहतं. पण तेच फक्त आपण पाहिलं, तर आपण कुठं जाणार आहोत, हे आपल्याला कळत नाही. म्हणून या दोन्ही बाबींचा मेळ घातला पाहिजे. आज भारतीय समाजाचं वास्तव असं आहे, की जातिव्यवस्था आजही मजबूत आहे. त्यामुळं एकीकडं ती नष्ट झालेली असावी हे दूरचं स्वप्न आहे.

काही आंतरजातीय विवाह होतात, त्यांचं महत्त्व मी कमी लेखत नाही. समतेच्या दृष्टीनं त्यातून काही पावलं पुढं पडतील. पण पाच-पन्नास ते हजार दोन हजार अशी लग्नं होऊन जातिव्यवस्था मोडणार नाही. उलट, त्यांची वेगळी जात निर्माण होते. हे मी त्यांना कमी लेखण्यासाठी म्हणत नाही. पण वास्तव असं आहे.

मग आपण काय करावं ? जातिव्यवस्था आहे, ठीक आहे; किमान आपण असं करावं, की त्या त्या जातीच्या अंतर्गत प्रबोधन आपण करावं. त्यांना मानवी मूल्यं पटवून द्यावीत.

पाच हजार वर्षांचे जुने संस्कार घेऊन जे मन उभं राहिलेलं आहे, त्याला एकदम तू जाती तोडून टाक असं म्हटलं तर ते तयार होणार नाही आणि त्यातून उलट ती व्यवस्था बळकट करायला ते मन मदत करेल.

एका बाजूला जे लोक जाती तोडण्याच्या चळवळी करतील त्यांना पाठिंबा द्यावा, प्रोत्साहन द्यावं, त्यांचा गौरव करावा; पण जाती मोडल्याशिवाय या देशात दुसरं काही प्रबोधन होणंच शक्य नाही असं जर आपण समजून राहिलो, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत जाण्याची वाटच विसरून जाणार आहोत.

म्हणूनच, त्या त्या जातीच्या अंतर्गत का होईना, पण त्यांच्यात आधी प्रबोधन होऊ द्या.

देण्या-घेण्याचं माप एक हवं.

एखाद्या देशासाठी किंवा समाजासाठी पंचवीस वर्ष हा कालखंड एखाद्या क्षणासारखा आहे. भारतीय इतिहासाबद्दल स्पष्टपणे बोलायचं झालं, तर गौतम बुद्ध ही तर एक ऐतिहासिक व्यक्ती होती. पूर्वीच्या व्यक्ती कदाचित पुराणकथात्मक असतील, असं वादासाठी मान्य करू या. बुद्धाप्रमाणेच महावीर ऐतिहासिक व्यक्ती आहे.

तेव्हापासून अडीच हजार वर्ष तरी झाली, की वर्णव्यवस्था मोडावी यासाठी आपण झुंजतो आहोत. पंचवीसशे वर्ष आणि पंचवीस वर्ष अशी आपण जरा तुलना करू या ! एवढ्या महान व्यक्तींनी त्याविषयी कामं करूनही येथील जातिव्यवस्था मोडली आहे असं दिसत नाही.

म्हणून येत्या पंचवीस वर्षांत जातिव्यवस्था नष्ट होईल, असं मला वाटत नाही. याचा अर्थ ती मोडू नये असं मला वाटतं, असं नाही. जातिव्यवस्थेच्या भवितव्याचा विचार केला, तर काय घडेल ? वस्तुस्थितीचा विचार केला, तर तिच्यावरील काही टवके उडतील, पण ती संपणार नाही.

भारतीय माणसाला त्याच्या एका दुटप्पी व्यवहारातून बाहेर काढावं लागेल. भारतीय मन अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे, की मी कदाचित माझ्यावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करीन; परंतु मी माझ्यापेक्षा दुबळ्यांवर जो अन्याय करतो, तो अन्याय करण्याचा माझा अधिकार मात्र टिकला पाहिजे;

माझं दुसऱ्यापेक्षा जे श्रेष्ठत्व, ते टिकलं पाहिजे आणि माझं हीनत्व नष्ट झालं पाहिजे. म्हणून महात्मा फुलेंचं तत्त्व महत्त्वाचं आहे, की माझं घेण्याचं आणि देण्याचं माप एकच असलं पाहिजे. तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जे बोलता त्याला नैतिकता केव्हा येते,

तर ज्या वेळेला तुम्ही स्वतः दुसऱ्यावर अन्याय करण्याचं सोडून देता आणि त्यालाही आपल्याबरोबर घेता. तेव्हा त्यासाठी भारतीय मन तयार करावं लागेल. ते करण्यासाठी तुम्हांला शाळेतल्या छोट्याछोट्या मुलांपासून तयारी करावी लागेल.

त्या मुलांना पूर्ण जुन्या विचारांमधे वाढू द्यायचं, शाळांतून ते संस्कार करायचे आणि मग मोठा झाल्यावर त्यानं क्रांतिकारक व्हावं आणि जातिव्यवस्था मोडून समतेचं तत्त्व आचरणात आणावं, हे शक्य नाही. हा दुटप्पीपणा दूर करायला हवा. एकदम क्रांतीची भाषा करणं ठीक आहे,

पण क्रांती अशी आपोआप उगवत नसते. त्यासाठी कष्ट करायला लागतात. दूरगामी विचार करावा लागतो. क्रांतीसाठी एकेका माणसाचं मन तयार करावं लागतं. येत्या पंचवीस वर्षामधे आपण किमान एक गोष्ट करायला हवी. आपल्या जातीतील लोकांना शिकवायला हवं, की दुसऱ्या जातीतल्या लोकांशी अधिक चांगलं वागणं हे खऱ्या माणूसकीचं चिन्ह आहे.

असे संस्कार करत गेलो, तर पंचवीस वर्षांमधे वेगवेगळ्या जातींचे लोक एकमेकांच्या अधिक जवळ येण्याची, एकमेकांना समजून घेण्याची, दोघांचंही होणारं शोषण सारखं आहे हे जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.

हे सगळं समजण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. हा जातीयवादी आहे, तो जातीचं संघटन करणारा आहे, अशा प्रकारचे शिक्के मारून आपण लोकांना बाजूला सारलं, तर जातिव्यवस्था तर मोडणार नाहीच, पण जातींच्या अंतर्गत प्रबोधनही होणार नाही. ते झालं पाहिजे.

कळसाला हात घालण्याऐवजी पायापासून सुरुवात करू या

Indian Social System भारतीय समाजाच्या संदर्भात स्त्रियांच्या साक्षरतेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार, त्याचा दर्जा वाढवणं, हेही महत्त्वाचं आहे. आधी आपण लोकांना अक्षरांचं भान देऊ या. ते नसताना परिवर्तनाच्या, जाती मोडण्याच्या गप्पा मारणं उपयोगाचं नाही.

अक्षरज्ञानानंतर त्यांना स्वतःच्या प्रश्नांचा विचार करणं, स्वतःच्या क्षमतांचा विचार करणं, चांगलं जगण्यासाठी आवश्यक असेल अशी साधनसामग्री उपलब्ध करून देणं आणि मग तिसऱ्या टप्प्यावर मूल्यांचा विचार देणं, हे सर्व कार्य टप्पे पाडूनच करता येतं असं नव्हे, सगळं एकाबरोबर दुसरं असंही चालू शकतं.

मला असं वाटतं कुठं तरी कळसाला हात घालण्यापेक्षा पायापासून सुरुवात करावी.
हे करताना अडचणी अनेक आहेत. आपल्यातल्या माणसांना त्यांच्या प्राथमिक गरजाच पूर्ण करता न आल्यामुळं ते प्रस्थापित व्यवस्थेला फितूर होतात.

आपलं चांगलं झालं की मग दुसऱ्यांसाठी कशाला लढा, असंही होतं. या देशातील क्रांती फसण्याचं प्राचीन काळापासून हे एक महत्त्वाचं कारण आहे, की शोषणाला बळी पडलेल्या गोटातून आलेले व ज्यांना संधी मिळाली ते लोक मागं वळून पहात नाहीत.

त्यामुळं चळवळी फसतात. हा कुणावर हेत्वारोप करण्याचा प्रश्न नाही. आत्मपरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे. ज्या बहुजन समाजातून तुम्ही आला, त्याच्याशी तुम्ही बांधीलकी ठेवणं आवश्यक आहे.

अन्यथा आपण पुन्हा शोषित अवस्थेला जाऊ, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. युद्धं केवळ शस्त्रास्त्रांवर जिंकली जात नाहीत, ती इच्छाशक्तीच्या आधारावर जिंकली जातात. आपल्या तरुण वर्गावर हे संस्कार आपण केले पाहिजेत.

त्यांच्या कार्यक्षमता सिद्ध होण्यासाठी काही दारं आपण किलकिली करू शकलो, तरी महत्त्वाचं आहे. आज मुलांच्या चेहऱ्यावर निराशा दिसते, तेव्हा काय करायचं सुचत नाही.

या परिस्थितीत निराश न होता चांगल्या रीतीनं कसं जगता येईल, म्हणजे खचून न जाता, हिंसाचाराकडं, गुन्हेगारीकडं न वळता, आहे त्या व्यवस्थेत स्वतः झगडत त्यांना निकोपपणे कसं जगता येईल हे पाहिलं पाहिजे. या दिशेनं येत्या पंचवीस वर्षांत आपण दहा-पाच पावलं जरी पुढं टाकली, तरी मला खूप समाधान वाटेल.

पुरोगामित्वाचं सोवळं व्हायला नको.

एक समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय तत्त्व आपण पाहिलं पाहिजे, की माणसाला काही तरी आधार लागतो. विवेकवादी माणूस काही मूल्यं घेऊन जगत असतो. पण जगामधे आपल्याला असं दिसेल, की धर्म नाकारणाऱ्या काही व्यक्ती वा काही गट असू शकतात, पण धर्म नको असं मानणारा समाजच्या समाज आपल्याला कुठंही आढळत नाही.

धर्म नाकारणं हे काही जणांना इष्ट वाटेल, पण धर्म मानण्यामुळं लगेच कोणी टाकाऊ होत नाही. धर्म माणसाची कोणती गरज भागवतो, हे धर्माचा अभ्यास करून समजावून घेणं गरजेचं आहे. धर्म जाणून घेणं, त्याची शक्तिस्थानं कोणती, त्याचा दुरुपयोग कसा होतो व तो टाळून त्याचा मानवी जगण्याला काही विधायक उपयोग होतो का, हे समजणं आवश्यक आहे.

महात्मा फुल्यांनी म्हणूनच सार्वजनिक सत्यधर्म मांडला होता. बाबासाहेबदेखील धम्माकडं वळले, असं दिसतं. धर्म जर हिंसक स्वरूपात येत असेल, द्वेष शिकवत असेल, माणसामाणसांमध्ये भेद माजवत असेल, तर धर्माचं ते रूप नाकारलं पाहिजे. पण धर्माचं नाव घेऊन माणसं माणसांवर प्रेम करायला शिकवत असतील आणि तो जगण्याचा आधार बनत असेल, तर ते स्वीकारलं पाहिजे. हे मी ‘धर्म की धर्मापलीकडे ?’

या पुस्तकापासूनच मांडत आलेलो आहे. शोषितांशी जर तुम्हांला जोडून घ्यायचं असेल, तर तुम्ही धर्माचं नैतिक रूप त्यांच्यापर्यंत नेलं पाहिजे. अन्यथा तुमच्या व्यक्तिगत पुरोगामित्वाचं, अहंकाराचं सोवळं होईल, पुरोगामी मूल्यं घरातल्या इतर वस्तूंसारखी तुम्ही तुमच्या घरात मांडून ठेवाल, पण समाजात ती उपकारक ठरणार नाहीत.

या दोन पर्यायांमधे आपण कोणता पर्याय स्वीकारणार ? सर्वसामान्य लोकांना ‘धर्म पाहिजे की नको’ याचं उत्तर ‘धर्म पाहिजे’ असं जर असेल, तर तिथं तुम्ही धर्मातील नैतिकता, माणूसकी यांचा पर्याय दिला पाहिजे.

असं केलं, तरच ते लोक प्रतिगामी धर्मवाद्यांकडे जाणार नाहीत. सांस्कृतिक संघर्षात प्रस्थापित लोकांशी लढताना हे ओळखणं फार फार आवश्यक आहे.

पुस्तकाचे नाव – ना गुलाम, ना उद्दाम

लेखक- डॉ. आ. ह. साळुंखे

शब्दांकन : डॉ. कुमार अनिल

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

%d bloggers like this: