POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

Grandmother – आजी माझ्या मायेचा सागर

1 Mins read
  • Grandmother - आजी माझ्या मायेचा सागर

Grandmother – आजी माझ्या मायेचा सागर

 

 

 

आपण कितीही मोठे झालो आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपण आपल्या बालपणातील अशा प्रेमळ व्यक्तींना कधीच विसरू नाही शकत. कारण त्या व्यक्ती म्हणजे “सुवर्ण मुद्रा “असतात आपल्या आयुष्यातल्या.कारण त्यांनी आपल्याला आपल्या निरागस वयात खूप जीव लावलेला असतो. त्यांच्या अनेक प्रेमळ आठवणी आपल्या अंतर्मनावर कोरलेल्या असतात. त्यामुळे ती व्यक्ती आणि त्यांच्या आठवणी आपण कायम मनामधे जपत असतो.त्या बाबतीत आम्ही खूप नशीबवान होतो की, आम्हाला आदरनीय शारदादेवी आजींसारख्या Grandmother आजी मिळाल्या होत्या.

आजींचे माहेर सांगोला तालुक्यातील बलवडी हे गाव.सरदार श्रीमंत शामरावजी लिगाडे हे Grandmother आजींचे आजोबा. सरदार शामराव लिगाडे हे छत्रपती शाहूंच्या काळातले सरदार होते. पंचक्रोशीतली बरीच गावे त्यांना इनाम म्हणून मिळाली होती. शिकारीच्या छंदामुळे व रॉयल फॅमिलीतील नातेसंबंधांमुळे सरदार श्रीमंत शामराव लिगाडे हे राजर्षी शाहू छत्रपतींच्या सानिध्यात आले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव श्रीमंत सरदार शामराव लिगाडे यांच्यावर पडला नाही तरच नवल.सरदार लिगाडे यांनी सांगोल्यात सत्यशोधकीय ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली. सांगोला हे या चळवळीचे प्रमुख केंद्र होते. पुरोहित वर्गाचे वर्चस्व धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी आणि सावकारी शोषणात भरडला जाणारा बहुजन समाज.या समाजाला मुक्त करण्यासाठी श्रीमंत सरदार शामराव लिगाडे यांनी या चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न केले.

ब्राह्मणेतर चळवळीचे लोन सांगोल्यातच नव्हे तर अवघ्या सोलापूर जिल्ह्यात पसरले होते.श्रीमंत सरदार शामराव लिगाडे यांनी केलेल्या कार्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या बाबतीत एक वेळेस सातारा जिल्हा परवडेल परंतु सोलापूर जिल्हा नको असा शेरा केसरीच्या वर्तमानपत्राने मारला होता. या चळवळीच्या प्रसारासाठी केशवराव जेधे, भास्करराव जाधव ,दिनकरराव जवळकर ,कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी मंडळी सांगोल्यात येऊन श्रीमंत लिगाडे सरदारांना भेटून गेली होती.सांगोला तालुक्यातील कडलास जवळा ,वाटंबर येथे सरदार लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली ब्राह्मणेतर चळवळीची भव्य परिषद भरली होती. या चळवळीने बहुजन समाजात अन्यायाविरुद्ध जागृती निर्माण केली. ग्रामीण भागात लोकांना आपल्या हक्काची जाणीव झाली.श्रीमंत सरदार लिगाडे यांना अनेक लोकांचा पाठिंबा असल्याने ते जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष व मुंबई असेंमलीचे सदस्य झाले. या चळवळीमुळे सरदार लिगाडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पहिले ग्रामीण नेतृत्व निर्माण केले. अशा डाव्या विचार विचारसरणीच्या आणि गोरगरिबांसाठी लढणाऱ्या घराण्यातील संस्कार आणि बाळकडू घेऊनच आजी साळुंखे पाटलांच्या घरात आल्या होत्या.

आजींचे माहेर जसे सरदार घराण्यातील तसेच आजोळ ही राजघराण्यातले होते .आम्हाला नेहमीच आज्जींच्या रॉयल नाते संबंधाविषयी कायमच अभिमान असायचा. आमच्या आजींचे आजोबा सरदार शामराव लिगाडे जसे पुरोगामी विचारांचे सरदार म्हणून प्रसिद्ध होते, तसे आजींचे आजोळ माळेगावचे जाधवराव राजघराणे म्हणून प्रसिद्ध होते .आम्हा नातवंडांना खूप खूप अभिमान वाटायचा या सर्व गोष्टींचा. राजे लखोजी जाधवराव यांचे पुत्र अचलोजी ,रघुजी आणि नातू यशवंतराव यांची दौलताबादला निजामशहाने दगाबाजीने हत्या केली तेव्हा राजमाता जिजाऊंचे संपूर्ण माहेरच उध्वस्त झाले. नंतर जिजाऊंनी आपले भाचे संताजी यांना रायगडावर आणून त्यांचे मोठ्या प्रेमाने पालन पोषण केले होते .

पुढे पुढे संताजी जाधवरावांचा वंशवृक्ष पसरला व त्यातील एक शाखा म्हणजे माळेगावचे जाधवराव. सिंदखेडच्या लखोजी जाधव रावांचीच माळेगाव ही एक शाखा आहे. हे माळेगाव म्हणजे आमच्या आजींचे आजोळ. आमच्या आजींच्या आई विमलदेवी कृष्णसिंह जाधवराव यांचे लग्न फलटणच्या श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब व फलटण अधिपती श्रीमंत मालोजीराजे यांनी नानासाहेब शामराव लिगाडे अकोले यांच्याशी मोठ्या थाटामाटात करून दिला होता. माळेगाव जाधवरावांनी आपल्या मुली अत्यंत मोठमोठ्या घराण्यात दिल्या होत्या. आदरणीय विमलदेवी यांच्या सर्व आत्या भारतातील अनेक राजघराण्यात दिल्या होत्या. मंजुळाराजे ग्वाल्हेर येथील सरदार गोविंदराव राजेमहाडिक यांना दिल्या होत्या .

श्रीमंत गजराराजे या बडोदा येथील बॅरिस्टर यशवंतराव गायकवाड यांना दिल्या होत्या.
श्रीमंत ताराराजे या म्हैसाळ येथील श्रीमंत केदारराव शिंदे सरकार यांना दिल्या होत्या.
श्रीमंत लक्ष्मीदेवी साहेब या फलटणचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना दिल्या होत्या.
श्रीमंत शकुंतलादेवी कोल्हापूर येथील श्रीमंत मालोजीराव घोरपडे
गजेंद्रगडकर यांना दिलेल्या.
श्रीमंत मंजाक्का या कोल्हापूर येथील श्रीमंत अमृतराव भोपेराव कदम यांना दिलेल्या .
या सर्व शंभूसिंह महाराजांच्या मुली होत्या .या मुली म्हणजे प्रत्येक राजघराण्यातल्या सुना होत्या.

राजे राजवाडे,सरदार , जहागिरदार , इनामदार यांच्या सहवासात Grandmother आजींचे बालपण गेले. त्यातल्या त्यात आजींना श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब यांचा सहवास सर्वात अधिक लाभला. फलटणच्या श्रीमंत लक्ष्मीबाई राणीसाहेब या अतिशय आधुनिक विचारांच्या होत्या. स्त्रियांमध्ये आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी व स्त्रियांनी, मुलींनी शिक्षण घेत जावे म्हणून त्या प्रचार करून जागृती निर्माण करत होत्या. श्रीमंत लक्ष्मीबाई राणीसाहेबांच्या सल्ल्याने आमच्या आजीसाहेब (शारदादेवी )त्या काळात हिंगणे येथील धोंडोपंत कर्वे यांच्या संस्थेत एस.एस.सी पर्यंत शिक्षण घेतल्या होत्या .कर्वे यांच्या या संस्थेशी श्रीमंत राणीसाहेबांचा धनिष्ठ संबंध होता .या संस्थेला राणीसाहेबांनी सढळ हस्ते मदत केली होती. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे इलेक्शनला उभे होते त्यावेळी श्रीमंत लक्ष्मीबाई राणीसाहेबांनी सर्व खर्चाचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी आमच्या आजीसाहेब शारदादेवी साळुंखे यांच्यावर टाकली होती. ती जबाबदारी अतिशय योग्य रीतीने आजीने पार पाडली होती. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय नामदार श्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळात १९४९ मध्ये मंत्री झाले तेव्हा त्यांच्या शपथविधीच्या साक्षीदार म्हणून Grandmother आजी हजर होत्या .केवढी अभिमानाची गोष्ट होती ती आमच्या सर्वांसाठी.

आमच्या आजींचे लग्न आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्याशी वयाच्या १७ किंवा १८ व्या वर्षी झाले असावे.लग्न होऊन आजीने जवळा येथील एका खेडेगावात पदार्पण केले. खरेतर आजी पुण्यासारख्या शहरात व फलटण सारख्या राजघराण्यात राहिलेल्या होत्या.आजोबा आमदार झाले तो एक दीड वर्षाचा कार्यकाळ अत्यंत सुखाचा गेला.अचानक आजोबाच्या निधनाने आजींवर आभाळच कोसळले. तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर अजूनही जसाच्या तसा उभा राहतो. किती लहान वय होते आजींचे.आयुष्य म्हणजे काय असते हे कळायच्या अगोदरच आजींचे आयुष्य संपले होते. समोर दुःखाचा डोंगर आणि काळोख चार मुले लहान .काय वाटले असेल त्या माऊलीला ,हे फक्त कल्पना करूनच पहावे लागेल .त्याही दुःखातून आजी सावरल्या .चांगले संस्कार आणि शिक्षण या दोन गोष्टीमुळे पुढील कार्यकाळ आजींनी न डगमगता पार पाडला .

समोर फक्त एकच विचार होता आपली चार मुले कशी घडवायची.हिंम्मत,इच्छा, धाडस हे सर्व असूनही जुन्या रुढी परंपरेच्या जोखडात अडकलेल्या समाजाने, नातेवाईकांनी आजीला घराच्या बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला होता. तो काळही तसाच होता.आजोबांच्या अकाली मृत्यूनंतर लोक भावनेच्या बळावर आजी नक्कीच निवडून येऊन आमदार झाल्या असत्या, आजी इतक्या धाडसी होत्या की आदरणीय प्रतिभाताई पाटील यांच्या बरोबरीने आजीने आपले स्थान निर्माण केले असते.प्रतिभा ताईंना भेटायला आजी दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्या मैत्रीण आदरणीय प्रतिभाताई पाटील यांनीच ही गोष्ट बोलून दाखवली होती. आजींचे व्यक्तिमत्व इंदिरा गांधींच्या बरोबरीचे होते. आजी बाहेर निघाल्या की इंदिरा गांधी चालल्या की काय असा लोकांना भास व्हायचा. एवढे आजींचे व्यक्तिमत्व भारदस्त होते. विद्वत्ता आणि व्यासंग यांच्या जोडीला असलेले विनम्रता व साधेपणा या गुणांमुळे त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व लोकांच्या आदराचा कौतुकाचा आणि भक्तीचा विषय बनले होते.

Grandmother आजीने केवळ लोकप्रियताच मिळवली नाही तर त्या उदंड लोक प्रेमाच्या ही धनी झाल्या होत्या. आजींवर निखळ आणि निर्मळ प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील स्नेहांकीतांची मांदियाळी हे त्यांनी मिळवलेले मोठे लोक वैभव होते. आजींच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे होती. Grandmother आजींनी आपल्या आयुष्याची उभारणी मोठ्या कष्टातून केली . आपल्या दोन हिऱ्यांना पैलू पाडून त्यांना कोहिनूर हिऱ्यासारखे चमकवून त्यांचे नाव जनमानसात उज्वल केले होते.एक पुत्र डॉक्टर तर दुसरा पुत्र राजकारण आणि समाजकारणात नावलौकिक केलेला. दोन्ही मुली घडवताना मुलगा मुलगी हा फरक आजीने कधीच केला नाही. सर्वांना समान वागणूक हे आजींचे तत्व होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या जगण्या ,वागण्यात कधीच कडवटपणा व अहंकाराचा दर्प नव्हता.अध्यात्म हा आजींचा आवडीचा विषय .आजींची ज्ञानेश्वरावर अतिशय भक्ती आणि प्रेम होते. ज्ञानेश्वरीच्या भक्तीत आजीने कधीही खंड पडू दिला नाही. ज्ञानेश्वरीचे पारायण करता करता अचानक आजींचा चष्मा जाऊन आजींना जवळजवळ दिव्य दृष्टीच प्राप्त झाली म्हणाना ,कारण वयाच्या ८३ व्या वयातही आजींना चष्मा नव्हता हे किती विशेष होते.

आजी जेंव्हा जेंव्हा ज्ञानेश्वरीचे निरूपण करत तेव्हा त्यांचे बोलणे गुलाबाच्या पाकळ्या उलगडत उलगडत संपूर्ण फुलांचे सर्वांग सुंदर दर्शन घडावे तसे असत. त्या कठीण विषयाची ललितरम्य शैलीत मांडणी करत. संतांचे विचार त्यांनी केवळ सांगितले नाहीत तर त्या विचारांशी सुसंगत असे त्यांचे सात्विक जगणे होते.आजींनी स्वःतबरोबर हरीपाठाचे वेड सर्वांनाच लावले होते. घरातील प्रत्येकाला हरिपाठ मुखोदगत असावा असा आजींचा दंडक होता. मातृतुल्य जिव्हाळ्याचे संस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणून आजींचा उल्लेख करावा लागेल .त्यांची सात्विक व प्रेमळ वात्सल्य मूर्ती अनेक लोकांचा आधार होती. विचारातील आणि आचारातील संपन्नता हा त्यांचा स्थायीभाव होता. कुटुंबात सुशिक्षित आणि संस्कार संपन्न स्त्री असेल तर संपूर्ण कुटुंब संस्कारी विचारांनी परिपक्व होण्यास मदत होते, त्याप्रमाणे Grandmother आजींचे संपूर्ण कुटुंब संस्कारक्षम व लोकाभिमुख व समाजमुख राहिले.

सामाजिक जाणीवेने व मनापासूनच्या तळमळीने कार्यरत राहिलेल्या आजींच्या प्रेमळ व्यक्तिमत्वाबद्दल सर्वांनाच कमालीचा आदर होता. आजींच्या आठवणीने डोळे भरून येतात .अपार माया आणि प्रेम देणारी व्यक्ती नाहीशी झाली की ,ही पोकळी कधीच भरून न येणारी ठरते. आजारपणात आजींच्यामध्ये फरक दिसू लागला तरीही त्या भजन कीर्तनातून वेळ घालवत .शरीर थकत गेले ,आजार पणाचा त्रास व्हायला लागला तरी त्या दुर्मुखलेल्या किंवा आयुष्याला कंटाळल्या असे कधीच वाटले नाही .त्यांच्या वागण्यात एक प्रकारची तृप्तता आणि समाधान दिसत असे .मला वाटते जीवनातल्या बदलत्या अनुभवांना इतक्या कौशल्याने सामोरे जाण्यासाठी लागणार सुज्ञपणा आणि विवेक त्यांच्यात भरपूर प्रमाणात होता .

मुले सुना , नातवंडे सगळ्यात त्या शेवटपर्यंत रस घेत राहिल्या, पण कोणाच्या वैयक्तिक मामल्यात दखल देऊन आपली मते त्यांच्यावर लादण्याचा दुराग्रह आजी कधीच करत नसत .त्यांच्या स्वभावात विविध वृत्तींचा अनोखा संगम होता. त्यांचे उठावदार व्यक्तिमत्व ,अनुभवावर बांधलेले ठोकताळे ,नव्या जुन्यांची अपूर्ण सांगड घालण्याचे कसब, खूप ऐश्वर्यात राहूनही टिकवीलेला साधेपणा ,प्रतिष्ठा उपभोगूनसुद्धा सामान्य माणसाविषयींची त्यांची अस्था .शरीर थकत चालले असतानाही मनाचा टवटवीतपणा कधीही झाकळून गेला नाही.

जीवनाच्या या प्रवाहात दिवस कसे जातात हे कळत नाही .हा हा म्हणता आजींना जाऊन एक महिना निघून गेला. परंतु Grandmother आजी मात्र मनातून दूर गेल्या नाहीत .असे म्हणतात की काळ सर्व काही पुसून टाकतो ,अगदी स्मृती सुद्धा ,परंतु काही व्यक्ती माणसाच्या आयुष्यात अशा येतात की त्या सदैव त्यांच्या जवळच असतात .त्यांचा आशीर्वाद जीवनात नेहमीच मार्गदर्शक असतो .आजींच्या निघून जाण्याने आमच्या घराण्यात आणि लोकांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. आजी एक दुवा होता .आजींच्या जाण्याने आमच्या साळुंखे पाटलांच्या घराण्याची शान गेली ,आमची लक्ष्मी गेली .आमच्या जवळ्याचा वाडा तर आता देव नसलेल्या देवाऱ्या सारखा भासतो आहे.आजींच्या जाण्याने आमच्या घराण्याचे वैभवा बरोबर एक प्रकरण संपले .

आज्जी आज आपल्यात नाहीत ,उद्याही त्या आपल्यात असणार नाहीत .नजरेआड झालेल्या आमच्या आजी आता पुन्हा नजरेस पडणार नाहीत .परंतु सर्व जनतेला त्यांचे कायम स्मरण होत राहील. माणूस कितीही शूर ,धाडसी असला तरी नीईती मोठी क्रूर असते हेच खरे.शेवटी शेवटी स्पंदन हाॅस्पिटलमधे आजींना पाहिल्यानंतर पांडुरंगाच्या आत्मरूपाशी एकरूप झालेले आजीचे देखणे रुपडे शांत झोपल्यासारखे दिसत असे .इतक्या शांतपणे झोपलेल्या आजी आम्ही कधीच कोणी पाहिल्या नव्हत्या. सर्वांना सोडून जाताना निश्चितच आजी अत्यंत समाधानी होत्या. त्यांची कोणतीही इच्छा त्यांच्या मुलांनी अपूर्ण ठेवली नव्हती.

“आचार विचार आणि उच्चारातली एक वाक्यता जपत ,विवेक आणि वैराग्य l हे चि जाणावे महत्भाग्य ll

या संत विचारांशी प्रामाणिक राहून सत्वशिल जगण्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण करणाऱ्या आजींचे जाणे म्हणूनच दुःखदायक आहे .
“आंम्ही जातो आपल्या गावा” “आमचा राम राम घ्यावा “
“तुमची आमची हेची भेटी”
“येथूनिया जन्म तुटी”

असे म्हणत मोठ्या समाधानाने Grandmother आजी निघून गेल्या .वैभवशाली जीवनाचा शेवट झाला .
आत्ताच्या पिढीने आजींच्या उदात्त जीवनाचा आदर्श सदैव समोर ठेवला पाहिजे .हीच खरी Grandmother आजींना श्रद्धांजली होईल.

चुकभूल माफ करावी

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

Dussera wishes -  नवरात्रोत्सव 10

error: Content is protected !!