Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

chhatrapati rajaram maharaj – छत्रपती राजाराम महाराज

1 Mins read

chhatrapati rajaram maharaj – छत्रपती राजाराम महाराज

 

chhatrapati rajaram maharaj – छत्रपती राजाराम महाराज यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

 

 

 

छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म रायगडावर २४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवरायांच्या पत्नी सोयराबाई राणीसाहेब यांच्या पोटी झाला. सोयराबाई या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी होत्या.राजाराम महाराज दहा वर्षाचे असताना त्यांचा विवाह प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई यांच्याशी शिवरायांनी करून दिला होता .यानंतर दहा-बारा दिवसातच शिवराय रायगडावर निधन पावले. शिवरायांच्या मृत्यूनंतर अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी, मोरोपंत पिंगळे या मंत्र्यांनी संभाजीराजांना कैद करण्याचे ठरवून राजाराम महाराजांचे मंचकारोहण करविले .संभाजीराजांना हे समजतात त्यांनी सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पाठिंब्याने हा कट उधळून लावला व राज्यकारभार आपल्या हाती घेतला.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांनी १६ जानेवारी १६८१ रोजी विधिवत स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला. संभाजींराजांनी आपल्या हातात सर्व सूत्रे घेतल्यानंतर chhatrapati rajaram maharaj राजाराममहाराज रायगडावर नजरकैदेत होते. मोगलांकडून ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराममहाराजांचा मंचकारोहणविधी रायगडावर पार पडला. तत्पूर्वी छ. संभाजींराजांनी राजाराममहाराजांची लग्ने हंबीरराव मोहित्यांची मुलगी ताराबाई व कागलकर घाटग्यांची राजसबाई यांच्याबरोबर केली होती. पुढे त्यांच्यापासून राजाराममहाराजांना अनुक्रमे शिवाजी व (दुसरे) संभाजी ही अपत्ये झाली. यांशिवाय राजाराममहाराजांना अंबिकाबाई नावाची आणखी एक पत्नी व नाटकशाळाही होती.या नाटकशाळेपासून झालेल्या मुलाचे नाव कर्ण होते.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी chhatrapati rajaram maharaj छत्रपती राजाराममहाराजांकडे आली. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर रायगडास मोगल सेनापती जुल्फिकारखान याने वेढा दिला. त्यामुळे गडावरील राजकुटुंबीयांची अवस्था बिकट बनत चालली होती. अशा अवस्थेत सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे आहे, हे ओळखून राणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना गडाबाहेर पडण्याचा व शत्रूशी जसा जमेल तसा मुकाबला करण्याचा सल्ला दिला. तेव्हा राजाराममहाराज सहकुटुंब काही प्रमुख सहकाऱ्यांसह ५ एप्रिल १६८९  रोजी गडाबाहेर पडले. मोगलांचा पाठलाग चुकवीत पुढे ते नोव्हेंबर १६८९ च्या पहिल्या आठवड्यात जिंजीला पोहोचले. मराठ्यांनी जिंजीलाच राजधानी केली. छ. राजारामांनी जिंजी येथे अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या. महाराष्ट्रात रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांनी मावळातील मोगलांनी घेतलेले किल्ले परत जिंकून घेतले. या वेळी परशुराम त्रिंबक हा प्रथम प्रसिद्धीस आला.

त्याने पन्हाळा किल्ला परत मिळवून दिल्याबद्दल छ. राजाराममहाराजांनी ‘सुभालष्करʼ व ‘समशेरजंगʼ हे किताब दिले आणि त्यास प्रतिनिधी नेमले. छ. राजारामांनी पुन्हा सरंजामीस प्रारंभ केला. ती त्या काळाची गरज होती. जिंजीला तीन लक्ष होनांचा खजिना होता. तो मराठ्यांनी ताब्यात घेतला. राजाराम महाराजांनी जिंजीला राजदरबार भरविला. त्यांनी रामचंद्रपंत अमात्यांना ‘हुकमतपन्हाʼ हा किताब दिला. संताजी आणि धनाजी यांची सेनापतिपदी नियुक्ती केली. शंकराजी नारायण, नेमाजी शिंदे, हनुमंतराव घोरपडे अशा विश्वासू माणसांना बरोबर घेऊन त्यांनी जिंजीवरून राज्यकारभारास सुरुवात केली.

जिंजी हा बलाढ्य दुर्ग जिंकून घेण्याची जबाबदारी जुल्फिकारखानावर होती. chhatrapati rajaram maharaj राजाराम महाराजांना पराभूत करण्यासाठी तो बलाढ्य फौज घेऊन जिंजीला आला व त्याने किल्ल्याला वेढा दिला. हा वेढा सलग आठ वर्षे चालू होता. राजाराम महाराजांनी जुल्फिकारखानाला अधूनमधून तहाची बोलणी करून झुलवत ठेवले. संताजी व धनाजी यांनी या वेढ्यात मोगली अधिकाऱ्यांना जेरीस आणले. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली ३०-३५ हजार मराठे सैन्य जमा झाले. हे सैन्य संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये विभागले गेले व पुन्हा मोगलांविरुद्ध युद्धास सुरूवात झाली. मोगल सरदार रुस्तुमखान साताऱ्याचा किल्ला कसा जिंकण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा राजाराम महाराजांनी रुस्तुमखानाकडे कुमक कमी आहे, ही संधी ओळखून संताजी आणि धनाजी यांना खानाच्या विरुद्ध पाठविले. मराठ्यांनी खानाचा पराभव केला (२५ जानेवारी १६९०). या लढाईत मराठ्यांना ४००० घोडी मिळाली, तर खानाकडून त्यांनी एक लक्ष होन दंड वसूल केला. रुस्तुमखानावरील विजयामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला. दोद्देरीच्या लढाईत संताजीने कासीमखानाचा पराभव करून खानजादखान यास कैद केले व त्याच्याकडून तब्बल वीस लाख होन एवढा दंड वसूल केला.

मराठ्यांच्या लढ्याचे लोकलढ्यात रूपांतर झाले. मराठ्यांनी रौद्र रूप धारण केल्याने मोगलांची अवस्था अतिशय बिकट झाली. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर संताजी-धनाजी यांनी काही काळ एकोप्याने राहून मोगली सैन्याला त्राही त्राही करून सोडले; पण पुढे या दोन असामान्य पराक्रमी सेनानींत दुही माजली. परिणामत: छ. राजारामांनी मे १६९६ मध्ये संताजीस सेनापतिपदावरून दूर करून त्या जागी धनाजीस नेमले. संताजीस बंडखोर ठरविण्यात आले. कर्नाटकात आयेवारकुटी येथे छ. राजाराम व धनाजी यांची संताजीशी लढाई झाली त्यात संताजी विजयी झाले, पण मराठी राज्याच्या दृष्टीने ती घटना घातक ठरली. राजाराममहाराजांनी धनाजींच्या मदतीने संताजीची मराठी फौज आपल्याकडे आणली. पुढे म्हसवडच्या नागोजी माने या सरदाराने संताजीचा खून केला.

छ. राजारामांनी पुत्र राजा कर्ण व खंडो बल्लाळ यांना २ ऑगस्ट १६९७ रोजी झुल्फीकारखानाशी तहाची बोलणी करण्याकरिता पाठविले. खानाला राजा कर्णाने पूर्ण वश करून घेतले. तेव्हा अंतस्थ रीतीने छ. राजारामांस पळून जाण्याचा इशारा मिळाला. या कामी गणोजी शिर्के व त्यांचा पुतण्या रामोजी या खानाकडील दोन मराठे सरदारांची मदत झाली.

छत्रपती राजाराममहाराजांच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अमंल खऱ्या अर्थाने संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपूर, कोल्हापूर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती.

मराठेशाही सन १६८८ ते १७०० शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली; ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपकडीनंतर व हत्येमुळे मराठेशाहीचा कणा पार मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणून राजारामाला मंचावर बसविले. हा कालावधी या छोट्या हिंदू राज्याला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. राजारामाच्या जीवनातील पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली;, काकरखानसारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली, १० जून ते १० ऑगस्ट १६८९ या काळात छ. राजारामाचे वास्तव्य प्रतापगडावर होते.

नंतर छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला, व राज्य कसे का होईना जिवंत ठेवले. छत्रपती राजाराम हा सन १६७०च्या २४ फेब्रुवारीला जन्मला. जन्मताना तो पायाकडून जन्मला म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां, शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालथी घातली नाही, तरी त्याने पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजाराम हा शांत धीरगंभीर प्रकृतीचा होता. राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे झाले.

१ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडले. गादीचा औरस वारस शाहू त्यावेळी ७ वर्षाचा पण नव्हता. त्याला छत्रपती सारख्या महत्त्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजारामला बसवायचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले. राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. महाराज संभाजी अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकले जाऊ लागले. चाऱ्हीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण, हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती. औरंगजेबाचे सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामाच्या मागेच लागले होते, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजारामाला दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना प्रतिनिधी पद देऊ केले.

ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरील सर्व परिस्थिती पहाता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अमलांत आणला. मोगलांचा वेढा स्वराज्याभोवती घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविण्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होता होईतो मराठी लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारून ठेवली होती. संभाजीच्या कालावधी शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते. फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते. वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा आपल्या छोट्या मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, व सरदार मोगलांना मिळाले.

छत्रपती संभाजीच्या वधानंतर स्वराज्याचा सर्व भाग अगदी काहीच दिवसात मोगली अमंलाखाली आला होता. स्वराज्य राहून राहुन सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन्-पाच किल्ले ऐवढे मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला. राजाराम महाराजांवर संकटावर संकटे येत होती. रामचंद्रपंत जे संभाजीच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना “हुकुमतपन्हा” हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले गेले. अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाला लक्षात आले. तुंगभद्रा नदीतीरी भीषण संग्राम झाला. महाराज स्वत लढत लढत नदीत उडी मारुन पळून गेले. बेदनूरला राणी चन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली. जिंजीला राजारामांचे जावई हरजीराजे महाडीक होते पण ते त्याच सुमारास वारले होते, अशातच राजाराम महाराज तिथे पोचल्यामूळे गोंधळ उडाला, घरच्याच लोकांस मात देऊन राजांनी जिंजी हस्तगत केली.

जिंजीसारख्या ८००-९०० मैल दूर असलेल्या प्रदेशातून chhatrapati rajaram maharaj राजाराम महाराजांनी ओरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले. वतनदारीच्या आमिषांमुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावात फिरुन गुन्हेगारांस शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंडींच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि येथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांच्या वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे इमान हे मुख्य राजा सोबत नसून वतनदारासोबत असे त्यामुळे “स्वराज्य” ही कल्पनाच नष्ट झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत. त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याचा न्यायाधिशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले.

अशातच एका मर्द मराठ्याने (संताजीने) औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. “हिंमते मर्दा तो मदते खुदा”. या वेळेस ओरंगजेबाचा खुदा मराठ्यांना मदत करीत होता. लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी झुल्फिकारखानावर हल्ला चढवून त्याचे पाच हत्ती पळवून आणले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांबवर उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली.

धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधू (बहिर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवसरात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत. “स्वराज्य” ही कल्पना टिकवून ठेवण्यासाठी ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली.
पुढे जिंजीवरच झुल्फिकारखानाने हल्ला केला. त्याला मदत होती फ्रेंच सैन्याची. महाराज परत अडचणीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीण, लढवायला मजबूत. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी शाहजादा कामबक्ष व झुल्फिकारखान या मोगली सरदारांचा धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूच्या परिसर जिंकून घेतला. ह्यानंतर लगेच संताजीचे व राजारामचे काही कारणावरून बिनसले. संताजी वापस महाराष्ट्रात निघून आला. पण इमान बघा या माणसाचे, तो मोगलांना वा इतरांना न मिळता स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होता. हे इमान पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. संताजीला एक वैषम्य होते ते म्हणजे मोगलांकडून फुटून जे नवीन लोक येतात राजाराममहाराज त्यांना जास्त विचारतात व जे जुने आहेत त्यांची काळजी घेत नाहीत.

महाराजांनी पत्र पाठवून निर्धोक राहा असे सांगितले, पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही, त्यामुळे महाराजांनी संताजीस त्याची फौज खाली करण्याचा हुकूमपण दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले. पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच. स्वराज्यासाठी नामुष्कीची गोष्ट अशी की संताजी व धनाजी यांत पण एक लढाई झाली. म्हणजे बघा आपण आपापसात पण लढतोय शिवाय मोगलांशीही लढतोय. ओरंगजेबाकडे १,४३,००० खडी फौज व ९६ मराठे सरदार होते यावरून राजाराम महाराजांचा लढा किती विचित्र होता याची कल्पना करता येते. मिर्झा राजाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती, पण राजारामाच्या काळात ती पूर्णपणे उखडली गेली होती. मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३०,००० ते ५०,००० इतके सैन्यपण भरत नव्हते. एकास साडेतीन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व, तर मराठ्यांचे सैन्य हे तलवार, बर्च्या व ढाली एवढेच घेऊन लढत होते.
सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्टावर सतत स्वाऱ्या होत होत्या, दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा, पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे वाटते.

अशा या थोर व शोर्यशाली छ.राजाराम महाराज यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: