bhagat singh – भगतसिंग : एक महान क्रांतिकारक साहित्यिक
अनिल भुसारी
bhagat singh भगतसिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 ला आणि 23 मार्च 1931 ला देशासाठी शहीद झाले. भगतसिंह 23 वर्ष, पाच महिने व 23 दिवस जगलेत. एवढ्या कमी दिवसाच्या आयुष्यात मात्र हुतात्म्यांचा मेरूमणी म्हणून ‘शहिदे -ए-आजम म्हणून गौरविल्या जाणे म्हणजे आधुनिक विज्ञान युगातील एक चमत्कारच म्हणता येईल. वर्तमान काळातील युवकांचे वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत शिक्षणचं सुरू असते. त्या तुलनेत भगतसिंगाच्या कार्याचा विचार केल्यास आश्चर्य वाटते. म्हणूनच त्यांच्या फक्त नावानेच देशातील लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत चैतन्य पसरते.
भगतसिंगाचा इतिहास आम्हाला अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकविल्या जातो, तो अगदी त्रोटक अर्धवट माहितीच्या आधारावर शिकविल्या जातो. त्यांचे अनेक पैलू समोर येणार नाहीत याची खबरदारी घेतल्या जाते. जेणेकरून भगतसिंगांच्या सर्वव्यापक कार्यातून आजचा तरुण प्रेरणा घेऊन शासन करणाऱ्यांनी जे बेरोजगारीचे थैमान घातले आहे, शिक्षण व आरोग्याचा बाजार मांडला आहे, गरिबांची थट्टा सुरू केलेली आहे आणि शासकीय संस्थांचा लिलाव मांडला आहे त्याविरुद्ध युवक क्रांती करतील, अशी भीती त्यांना आहे. म्हणून bhagat singh – भगतसिंग पूर्णपणे कळू दिल्या जात नाही.
जेव्हा आम्ही आईच्या पदरात लपून व बापाचा बोट धरून चालणारी पंधरा वर्षाचे मुलं पाहतो किंवा पालक म्हणून आम्ही तसे वागतो, तेव्हा त्या मुलांचे आणि देशाचे भवितव्य काय असेल हे लक्षात येते. भारतमातेवर इंग्रजांकडून व जमीनदारांकडून होत असलेला अन्याय पाहून न झाल्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षी भगतसिंगाने स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले. तिथून फक्त त्यांना साडे आठ वर्षाचे आयुष्य जगता आले. त्या काळात त्यांनी तरुणांना एकत्रित आणून स्थापन केलेल्या संघटना, सतरा वर्षांपासून वृत्तपत्रांतून लिखाणास केलेली सुरुवात, अनेक नाटकात कलाकार म्हणून सहभाग, स्वातंत्र्यलढ्या करीता हातात पिस्तूल घेऊन केलेले आंदोलने व त्याचबरोबर हातात पेन घेऊन कुटुंबातील सदस्यांना धीर देणारे पत्र, मित्रांना प्रेरणा देणारे पत्र, सरकारच्या विरोधात काढलेले निवेदने आणि देशवासीयांना प्रेरित करणारे निर्माण केलेले साहित्य त्यांना लाभलेल्या कमी आयुष्यात त्यांच्या कार्याचा आवाका बघितल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
भगतसिंग म्हणजे फक्त हातात पिस्तूल घेऊन इंग्रजांविरुद्ध लढणारा, सॉडर्सला गोळया घालणारा व कायदेमंडळात बॉम्ब फेकणारा एक विद्रोही क्रांतिकारक एवढीच त्यांची ओळख नाही. त्यांचे अनेक पैलू आहेत. त्यापैकी त्यांचा एक पैलू म्हणजे साहित्यिक होय. ते एक महान साहित्यिक होते. साडे तेवीस वर्षांच्या काळात त्यांनी निर्माण केलेले साहित्य वाचल्यास आपल्याला त्याची प्रचिती येईल.

bhagat singh – सरकारला उद्देशून काढलेले निवेदन व पत्रक :-
कोणतीही क्रांती ही यशस्वी करायची असेल तर त्याकरता जनतेचा सहभाग महत्त्वाचा असतो आणि जनतेचा सहभाग घेण्यासाठी प्रथम त्यांचे प्रबोधन करावे लागते. त्यासाठीचे अनेक प्रकार आहेत. अनेक क्रांतिकारकांनी अनेक बाबींचा वापर केला. भगतसिंह यांनी मात्र तरुणांचे संघटन करून त्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यासाठी विविध पत्रके – निवेदने काढली आहेत. ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुद्धा केलेले आहेत. असे जवळपास त्यांनी 34 पत्रके काढली आहेत. त्या सर्वांचा या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही. परंतु त्यापैकी ‘बहिऱ्यांना ऐकविण्यासाठी’, ‘हिंदुस्तानी समाजवादी प्रजासत्ताक सत्ता, ‘साक्षीदारांपेक्षा रसगुल्ले महत्वाचे’, ‘आम्हाला बंदुकीच्या फैरीने उडवा’, ही त्यांची पत्रके व निवेदने वाचल्यानंतर लेखणीद्वारे सरकारला कसे धारेवर धरायला हवे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. सरकारची हाजी – हाजी व चापलुसी करणाऱ्या आजच्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने आवर्जून ही पत्रके एकदातरी वाचावीत.

bhagat singh – क्रांतिकारकांना, मित्रांच्या व स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना लिहिलेले पत्रके:-
स्वातंत्र्यलढ्यासाठी कसे नियोजन असावे या संदर्भाने त्यांनी त्यांच्या सहकारी क्रांतिकारकांना त्यामध्ये मित्र जयदेव, बटुकेश्वर दत्त, सुखदेव आणि इतर सहकार्यांना बलिदानापूर्वी काही पत्र लिहिलीत, तसेच बटुकेश्वर दत्त च्या बहिणीला आणि कुटुंबातील सदस्यांना सुद्धा पत्र लिहिलीत. अशी एकूण जवळपास 23 पत्रके त्यांनी लिहिली आहेत. त्यातून त्यांची क्रांतिकारी नैतिकता व त्यांचे वैयक्तिक विचारांचे दर्शन होते. लग्नाच्या संबंधी वडिलांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, “माझे जीवन मी उच्च आदर्शसाठी समर्पित केले आहे. त्यामुळे मला सांसारिक सुख व ऐषआराम याचे आकर्षण नाही. यासंदर्भात ते आपल्या मित्रांना सांगतात, “गुलाम भारतात आपले लग्न झाले तर मृत्यू हीच आपली वधू असेल.” त्यावेळी त्यांचे वय होते अवघे पंधरा वर्षे. इतक्या लहान वयातील त्यांचे विचार ऐकल्यावर त्याने देशासाठी स्वतःला किती समर्पित केले होते हॆ लक्षात येते. अनेक लोक आपल्या अविवाहितपणाचे किंवा कुटुंब नसण्याचे मार्केटिंग करून राजकारण करतात व सत्तेची मजा घेतात. अशांनी एकदा भगतसिंग समजून घ्यावा.

bhagat singh – विद्यार्थी – युवाकांकरिताचे साहित्य:-
भगतसिंग म्हटलं की युवकांना एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा मिळतो. बाहू स्फूरण पावतात. ते फक्त त्यांनी केलेल्या सशस्त्र क्रांतीनेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या लेखणीतून दाखविलेल्या मार्गामुळे सुद्धा.16 मे 1925 ला साप्ताहिक मतवाला या वृत्तपत्रातून ‘युवक’ या शीर्षकाखाली, ‘विद्यार्थी आणि राजकारण’ हा शीर्षक असलेला लेख जुलै 1928 मध्ये किरती या वृत्तपत्रातून लिहिला, तसेच त्यांनी बटुकेश्वर यांना ‘विद्यार्थ्यांना उद्देशून’ लिहिलेले पत्र पंजाब छात्र संघाच्या लाहोर येथील अधिवेशनात वाचून दाखविण्यात आले होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नेताजी सुभाष चंद्र बोस. या पत्राचा सारांश सांगायचा झाल्यास, “.देशासाठी रक्त सांडायचे झाल्यास युवकांशीवाय कोण देणार? बलिदान हवे असेल तर युवकांकडेच वळायला लागेल. युवकच समाजाचे भाग्यविधाते आहेत. युवकांनी त्यांचे पूर्ण शिक्षण घेऊन राजकारणात सहभाग घेऊन देशाची धुरा सांभाळण्याचे ते आव्हान करतात”. भगतसिंग यांनी लिहिलेले हे लेख मरणाअवस्थाकडे टेकलेल्या परंतु खुर्चीचा मोह सोडू न पाहणाऱ्या राजकारण्यांनी आणि राजकारणा पासून अंतर ठेवू इच्छिणाऱ्या युवकांनी सुद्धा वाचून काढावे.

bhagat singh – समाजक्रांती घडविणारे साहित्य :-
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात होऊ घातलेल्या क्रांतीला पायाभूत वैचारिक मांडणी ज्या काही मोजक्या महान व्यक्तींनी केली त्यामध्ये भगतसिंगाची गणना होते. हे त्यांनी त्या काळात विविध घटना व बाबींना उद्देशून लिहिलेल्या लेखातून प्रतिबिंबित होते. त्यांनी समाजक्रांती घडविणारे जे लेख लिहिले त्यामध्ये प्रामुख्याने ‘आम्ही कशासाठी लढत आहोत?’, ‘इन्कलाब जिंदाबाद काय’? ‘सत्याग्रह आणि संप’, ‘भारतीय क्रांतीचा नमुना’, ‘नवजवान भारत सभेचा जाहीरनामा असे जवळपास 13 लेख त्यांचे त्याकाळी प्रकाशित झालेत. नवजवान सभेचा जाहीरनामा वाचल्यास भारतीय संविधान कसं असावं? याची एक प्रकारे त्यात मांडणी केल्याचे दिसून येते. त्यात ते म्हणतात, “भारतात स्वतंत्र व सार्वभौम संघराज्य स्थापन झाले पाहिजे”. जी ऊर्जा त्यांच्या सहकाऱ्यांना ज्या विचारांमधून आणि कार्यातून लाभली ते दस्तावेज आपण सर्वांनी वाचणे आवश्यक आहे.

bhagat singh – धर्म-जात व दैववाद विषयक साहित्य :-
धर्मांधता, धार्मिक सुधारणा, धर्मनिरपेक्षता, नास्तिकता, अस्पृश्यता याबद्दल ते गोल-गोल भूमिका न घेता क्रांतिकारक भूमिकेचे भान ठेवून त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांच्या भूमिका ‘अस्पृश्यता समस्या’, ‘धर्म आणि आपला स्वातंत्र्यसंग्राम’, ‘मी नास्तिक का आहे’?, ‘धर्मांध दंगली व त्यावरील उपाय’, या लेखातून व्यक्त केल्या आहेत. त्यात मी नास्तिक का आहे? ही पुस्तिका त्यांनी 1930 च्या दरम्यान तुरुंगात असताना लिहिलेली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी जून 1931 मध्ये ‘द पीपल’ या साप्ताहिकात छापली. यातील धर्मांध दंगली व त्यावरील उपाय या लेखात त्यांनी तत्कालीन वृत्तपत्रांना उद्देशून जे लिहिले ते आजच्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला तंतोतंत लागू पडणारे आहे ते म्हणतात, “.एकेकाळी अत्यंत उच्च व पवित्र समजला जाणारा पत्रकारितेचा व्यवसाय आज अत्यंत किळसवाणा झाला आहे. हे लोक एकमेकांच्या विरोधात मोठमोठे मथळे देऊन लोकांच्या भावना भडकवतात आणि परस्परांची डोकी फोडण्याचे काम करून घेतात. स्थानिक वृत्तपत्रातून भडक लेख प्रसिद्ध झाल्यामुळे एक-दोनच नाही तर अनेक ठिकाणी दंगली झाल्यात, अशा काळात हे डोके व मन शांत ठेवून लिहिणारे लेखक फार कमी आहेत”.

bhagat singh – आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचार :-
भगतसिंग यांनी भारतीय स्वातंत्र्या करीता जे योगदान दिले. युवकांना प्रेरित करणारे जसे लेख लिहिले आहेत, तसेच जागतिक स्तरावर सुद्धा प्रेम, बंधुता.कशी नांदेल या संदर्भाने सुद्धा त्यांनी ‘विश्व प्रेमाने’ हा लेख तर ‘अंतरराष्ट्रीय क्रांतिकारी विचार’ व रशियाचे युगप्रवर्तक यासंदर्भाने त्यांनी तुरुंगातून 24 जानेवारी 1930 ला लेनिन दिनाच्या निमित्ताने मास्को ला केलेली इंटरनॅशनल तार. त्या तारेच्या शेवटी म्हणतात, “श्रमिक सत्तेचा विजय असो – भांडवलशाहीचा नी:पात हो”. परंतु त्याच भगतसिंगाच्या देशात श्रम करणाऱ्यांना लुबाडूण, शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दारात बांधणारे कायदे निर्माण केले जात आहे आणि ते सुद्धा भगतसिंगाचे नाव घेत.

bhagat singh – स्वातंत्र्यासाठीचे उठाव व क्रांतिकारक :-
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे काही लढे आंदोलने झालीत त्यापैकी काही स्वातंत्र्यलढ्याच्या उठावाच्या संदर्भाने त्यांनी लिहिलेले लेख वाचनिय व प्रेरणादायी आहेत. इंग्रजांनी जसे स्वातंत्र्य लढ्याला दाबण्याचा प्रयत्न केला, तसेच आज स्वतंत्र भारतात सुद्धा न्याय – हक्क मागण्या करीता देत असलेल्या लढ्यांना देशद्रोही ठरविला जात आहे. स्वातंत्र्य लढ्याबरोबर भगतसिंगानी त्या काळातील काही क्रांतिकारकाचे कार्य त्यांच्या लेखातून शब्दबद्ध केले आहेत. मदनलाल धिंग्रा, शहीद करतार सिंह, शहीद उधम सिंह असे जवळपास 34 क्रांतिकारकां संबंधित लेख त्यांनी लिहिले आहेत.

bhagat singh – एका हुतात्म्याची नोंदवही अर्थात जेल डायरी :-
भगतसिंगांनी जे लेख आणि साहित्य लिहिले त्यामध्ये सर्वात प्रदीर्घ आणि मोठा म्हणता येईल असा लेख किंवा ग्रंथ म्हणजे त्यांनी तुरुंगात असताना लिहिलेली त्यांची जेल डायरी. एकीकडे आपल्याला काही असेही लोक सापडतात की तुरुंगवासाची झालेली शिक्षा रद्द करण्या करिता सरकारला माफी मागायला मागेपुढे पाहात नाहीत, तर दुसरीकडे फाशीची शिक्षा होऊन सुद्धा फाशीच्या दिवसाची आनंदाने वाट पाहात असणारा भगतसिंग. तुरुंगात माफीनामे लिहीत न बसता, स्वातंत्र्यांनंतर या देशाला व या देशातील तरुणांना दिशा देणारे लेख लिहीत होते. ते लेख ‘जेल डायरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या डायरीमध्ये ते प्रेम, धर्म, गुलामगिरी, दारिद्र्य, सध्याची समाजव्यवस्था, कारावास, समाधान, अपराध आणि शिक्षा, विवाह, शैक्षणिक धोरण, संस्कृती आणि प्रगती, स्वप्न आणि वास्तव, सद्सद्विवेक, क्रांतीयुग, संपत्ती पासून मुक्ती, समाजवादी क्रांती, विवाह संस्था, परोपकारी निरंकुश सत्ता, राज संस्थेची उत्पत्ती, राज्यसंस्था, स्वातंत्र्य आणि इंग्रज लोक, गर्दीची सूडभावना, राजा आणि राजेशाही, नैसर्गिक आणि नागरी अधिकार, राजाचे वेतन, मला स्वातंत्र्य द्या किंवा मृत्यू, म्हातारा मजूर, गरीब मजूर, नैतिकता, भूक, स्वातंत्र्य मुक्त विचार, हुतात्मा, खालचा वर्ग, नवा विचार, सर्व विरुद्ध एक, स्वातंत्र्याचा वृक्ष, शिकागोचे हुतात्मे, क्रांतिकारकाचे मृत्युपत्र, भांडवलशाहीचा विनाश, कोणताही वर्ग नाही कोणतीही तडजोड नाही, धर्मासंबंधी काल मार्क्सचे विचार, क्रांती आणि वर्ग, लोकशाही शब्दाची व्याख्या. अशा अनेक शीर्षकाखाली त्यांनी लेख लिहिले आहेत. जे प्रेरणादायी आहेत. वेळ आणि जागे भयास्तव या ठिकाणी उल्लेख करणे सोयीचे नाही.
भगतसिंगाच्या साहित्य आणि वाचनाच्या वेडेपणाबद्दल त्यांचे सहकारी क्रांतिकारक मित्र शिव वर्मा यांनी 23 मार्च 1985 रोजी पुण्यातील जाहीर सभेत सांगितले की, “लोकांसमोर भगतसिंगाची प्रतिमा हातात पिस्तुल घेतलेला अशी आहे. पण मी प्रत्यक्षात पाहिलेल्या भगतसिंहाच्या लांब ढगळ कोटाच्या एका खिशात पिस्तूल असेल तर दुसऱ्या खिशात पुस्तक. तो नेहमी वाचनात गढलेला असे. रस्ता सुनसान असेल, तर त्यावरून चालताना तो पुस्तक वाचत असे”. यावरून भगतसिंगाचे साहित्य आणि वाचनावरच प्रेम दिसून येतो. असे भगतसिंग मात्र आम्हा पासून कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न इंग्रज सरकारने जसा केला तसेच इथल्या व्यवस्थेने सुद्धा केला आहे. भगतसिंगांच्या नंतर त्यांचे अप्रकाशित साहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल असं म्हणायला अनेक शंका आहेत. या देशात अखिल स्तरावर म्हणवणारे अनेक साहित्य परिषदा आहेत आणि त्या माध्यमातून स्वतःच स्वतःच्या पाठीवर थाप देणारे साहित्यिक आहेत. परंतु त्यांना कधी भगतसिंहाच्या साहित्यावर भाष्य करावं वाटलं नाही. कारण या देशातील साहित्य क्षेत्र सुद्धा जात नावाच्या आजाराने ग्रस्त झालेले आहे.
मित्रांनो ऐन तारुण्यात त्यांनी केलेले बलिदान फक्त स्वातंत्र्यासाठी होतं असं नाही, असे असते तर त्यांच्या आधी व नंतर सुद्धा अनेकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, परंतु जेवढी मोहिनी करणारी जादू भगतसिंगाच्या नावाने निर्माण केली, ते भाग्य फार कमी लोकांना प्राप्त झाले. त्यामागचं कारण म्हणजे bhagat singh – भगतसिंगाचे आयुष्य चाकोरीबद्ध नव्हते तर ते सर्व व्यापक व सर्व स्तरापर्यंत होते. भगतसिंग यांनी केलेले कार्य आणि त्यांनी लिहिलेले साहित्य यांचा अभ्यास आजच्या तरुणाईने केल्यास त्यांना वर्तमानात असलेल्या बेरोजगारी, महागाई, शिक्षण व आरोग्याचे व्यापारीकरण. देश भांडवलदारांच्या हाती सोपविण्याचे जे षड्यंत्र सुरू आहे, त्या विरुद्ध लढण्यास नक्कीच एक उर्जा ठरेल. शेवटी म्हणावं वाटतो……

ए भगतसिंग तू जिंदा है,
इन्कलाब के नारे मे,
हर एक लहू के कतरेमे,
हर एक लहू के कतरें मे||
115 व्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन..!!
(संदर्भ ग्रंथ : शहीद भगतसिंह समग्र वांङमय )
अनिल भुसारी
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.